नाशिक: सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना आपल्या प्रकल्पास लागू होऊ नये म्हणून जागामालक आणि विकासकांनी संगनमताने बनवेगिरी करत केलेल्या घोटाळ्यात शहरातील अनेक बड्या बिल्डरांचा देखील सहभाग असल्याचे उघड झाले आहे. ४९ प्रकरणांत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यातील तब्बल १९७ संशयितांची नावे अखेर समोर आली आहेत.

​सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत नाशिक महापालिका क्षेत्रातील चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या गृहप्रकल्पात २० टक्के सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. ही घरे बांधून ती ‘म्हाडा’कडे वर्ग करावी लागतात. या निकषाला वळसा घालण्यासाठी बिल्डरांनी केलेले उद्योग चौकशीत उघड झाले. या जमिनींचे प्रत्यक्षात विभाजन आणि नियमानुसार मोजणी झालेली नसताना जागामालक व विकासकांनी भूमी अभिलेख कार्यालयाची बनावट स्वाक्षरी, शिक्के, नकाशे, आकारफोड पत्रक खरी असल्याचे भासवत उपरोक्त क्षेत्राचे तुकडे केले आणि म्हाडा, महसूल व भूमी अभिलेख विभागासह शासनाची फसवणूक केली. संशयितांनी केलेल्या धुळफेकीमुळे म्हाडाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटासाठी किमान चार हजार ते कमाल साडेसहा हजार सदनिका मिळू शकल्या नाहीत. ​

तक्रारीत ४९ प्रकरणांत केवळ सर्वे क्रमांकाचे उल्लेख झाल्यामुळे बिल्डरांचा बचाव केला जात असल्याची साशंकता व्यक्त होऊ लागली. यावरून विधानसभेत गदारोळ झाल्यानंतर यंत्रणांकडून बिल्डर व विकासकांची यादी पोलिसांना दिली गेल्याचे बोलले जाते. बनावट कागदपत्रांच्या आधारे तुकडे पाडण्यात आलेल्या या जागा नाशिक, गंगापूर, चेहेडी, पंचक, नांदूर दसक, म्हसरूळ, विहितगाव, वडनेर दुमाला, देवळाली, आगरटाकळी, आडगाव येथील आहेत.

​या प्रकरणातील संशयितांमध्ये राजयोग एंटरप्रायझेसचे भागीदार अभिषेक ठक्कर, हॅपी होम डेव्हलपर्सचे विनोद मनवानी, नहार डेव्हलपर्सचे अभय नहार व शिवांग बटाविया, गणेश गिते, मिलिंद धात्रक, राजेंद्र शहा, भावेश शहा, धर्मेंद्र शाह, जयंतीलाल शाह, श्रीजी लाईफ स्पेसचे भागीदार अंजन भालोडिया, संजय जैन, विक्रम कापडिया, सुशील बागड, मुकेश जैन, अन्वर मणियार, दीपक करमचंदानी, सलीम कोकणी, विशाल शहा, सिद्धिविनायक बिल्डकॉनचे प्रशांत राठोड, आराध्य इन्फ्राचे वाय. के. अलई, एस. एम. सोनजे, दिनेश अग्रवाल, कुबेर लक्ष्मी भागीदारी संस्थेचे कर्सन पटेल, संगीता भंडारी, अजय भंडारी, आकाश कोचर, शकुंतला धाडीवाल, अश्विनी जैन, अशोक बागमार, ललित साखला, विद्या साखला, हिना साखला, गरिमा साखला, राहुल लुनावत, अमीर कुंवर आदींचा समावेश आहे. ४९ प्रकरणांत जागामालक आणि विकासक अशी एकूण १९७ संशयितांची भलीमोठी यादी आहे.

महापालिकेकडून विकासकांची यादी सादर…

काही संशयित याआधी अन्य जमीन घोटाळ्याशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. संशयितात सत्ताधारी भाजपच्या एका माजी पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. या प्रकरणात बिल्डरांच्या चलाखीमुळे काही मूळ जागामालक व शेतकरी यांची नावे गोवली गेल्याची सांगितले जाते. ​४९ गृहनिर्माण प्रकल्पांत बांधकाम परवानगी किंवा तात्पुरत्या, अंतिम अभिन्यासास मंजूर केलेल्या मालक व विकासकांची यादी महापालिकेकडून प्राप्त झाल्यानंतर संशयितांमध्ये ९३ जणांचा समावेश करण्यात आल्याचे तपास यंत्रणेने म्हटले आहे.