नाशिक – बारावीची परीक्षा तोंडावर असतांना घरातील वातावरण, आजुबाजुच्या लोकांचे सतत बोलणे, घरात एक प्रकारचे संमिश्र वातावरण या सगळ्या वातावरणात बिथरलेल्या त्या विद्यार्थ्याने परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय समोर येताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण केवळ एकच पालकांच्या अवास्तव अपेक्षा आणि परीक्षेचा ताण या सह काही अन्य उदाहरणांमुळे विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने मंगळवार पासून बारावी परीक्षेस आरंभ झाला. लवकरच दहावीच्या लेखी परीक्षेस सुरूवात होईल. दहावी-बारावी परीक्षेस यंदा तीन लाखांहून अधिक विद्यार्थी सामोरे जात असतांना परीक्षा काळात विद्यार्थ्यांमधील ताण-तणाव समोर येत आहे. परीक्षेपेक्षा विद्यार्थ्यांच्या मनात पालकांची भिती जास्त प्रमाणात असल्याचे चित्र आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाच्या वतीने समुपदेशकाची नियुक्ती केली आहे. नाशिक साठी किरण बावा आणि अरूण जायभावे समुपदेशक म्हणुन काम पाहत आहे.
या विषयी बोलतांना जायभावे यांनी सांगितले, आत्ता पर्यंत १५ हून अधिक विद्यार्थी-पालकांनी संपर्क केला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आई वडिलांकडून ज्या अपेक्षा सांगितल्या जातात त्याचा ताण येतो, या ताणाचे रुपांतर भितीत होत आहे. बारावी परीक्षा सुरू होण्याआधी एका विद्यार्थाने सांगितले मला परीक्षाच द्यायची नाही. हे ऐकुन त्याची आई रडकुंडीला आली.
समुपदेशन करतांना लक्षात आले, सतत परीक्षे विषयी भिती घातली गेली. आपण नापास होऊ हे त्याच्या मनात पक्क झाले. नापास होणार आहोत तर मग परीक्षा का द्यायची या निर्णया वर तो आला. त्याचे समुपदेशन केल्यानंतर तो परीक्षेला जाण्यास तयार झाला. अशाच काही तक्रारी विद्यार्थ्यांकडून होत आहे. दुसरीकडे अभ्यास करतांना परीक्षेसाठी लागणारा वेळ-लिखाण याचा ताळमेळ बसत नाही. काहींनी अभ्यास केलाच नाही पण आता काय करावे अशी विचारणा होत आहे. वेळेचे नियोजन करतांना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहे.
किरण बावा यांनी सांगितले, विद्यार्थ्यांना पालकांची भिती वाटत आहे. मुलांनी वर्षभर अभ्यास केला तर ते चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होतीलच पण नाही केला तर त्यांना ऐनवेळी वाचुन काय येणार? पालकांनी विद्यार्थ्यांचे केवळ निरीक्षण करा. तो अभ्यास करतो की त्याचा देखावा हे पहा असा सल्ला दिला.
परीक्षा किंवा त्या संबंधित काही तक्रार, शंका असल्यास किरण बावा ९४२३१८४१४१, ९४२३०२६३०२, अरूण जायभावे ९६५७५०१७७३ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच टेलिमानस १४४१६, मनोदर्पण ८४४८४४०६३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.
