नाशिक: पर्यटकांवर हल्ल्याच्या प्रकरणामुळे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली हे पर्यटनस्थळ सर्वत्र चर्चेत आले. एरवी काही तुरळक प्रकार वगळता भावली पर्यटन स्थळ कायमच निसर्गप्रेमी पर्यटकांना आकर्षित करीत आले आहे. पावसाळ्यात तर भावली परिसरातील पर्यटनाला खरा बहर येतो. पर्यटक हल्ला प्रकरणानंतर पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भावली पर्यटन स्थळ या आठवड्यात पुन्हा चर्चेत आले आहे.
पावसाळ्यात इगतपुरीतील निसर्गरम्य भावली धरण पर्यटकांना भुरळ घालते. १२ जुलै रोजी नाशिकच्या पर्यटक कुटुंबाबरोबर घडलेल्या घटनेमुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये काहीशी भीतीची आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. त्यामुळेच रविवार असूनही १९ जुलै रोजी भावली धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले. पर्यटकांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी कठोर पवित्रा घेतला आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी आणि अपर पोलीस अधीक्षक विमला एम. यांच्या आदेशाने पोलिसांनी सुटीच्या दिवशी भावली धरण तसेच इगतपुरी तालुक्यातील इतर गर्दीच्या पर्यटन स्थळांवर सतत पहारा आणि तपासणी सत्र राबविले आहे.
रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने १९ जुलै रोजी पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यचा अंदाज बांधत इगतपुरीचे पोलीस निरीक्षक श्याम बलप आणि अमलदारांचे पथक भावली धरणाच्या मुख्य मार्गावर आणि परिसरात तैनात होते. धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर संशयास्पद वाहनाची कसून तपासणी त्यांच्याकडून करण्यात आली.
काही तरुणांचे टोळके पर्यटन स्थळी येतात. परंतु, पर्यटनाचा आनंद घेण्याऐवजी हुल्लडबाजी, तरुणी, महिलांची छेड काढणे, त्यांच्याविरुध्द अपशब्द काढणे, असे प्रकार करण्यातच त्यांना आनंद वाटत असतो. असे प्रकार करणाऱ्या तसेच पर्यटन स्थळांसह रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या, महिलांची छेड काढणाऱ्यांना खास ‘पोलिसी प्रसाद’ मिळाला. गडबड गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी दंडुके दिले. पोलिसांच्या या कठोर भूमिकेचे कुटूंबासह पर्यटनासाठी आलेल्यांनी स्वागत केले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक डाॅ. डी. एस. स्वामी यांनी नाशिक जिल्ह्यातील केवळ भावलीच नव्हे तर, सर्वच पर्यटन स्थळांवर पाेलीस ठाणेनिहाय गस्त आणि बंदाेबस्त तैनात करण्यात आल्याचे म्हटले आहे. पर्यटकांनी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच काही आपत्कालीन स्थितीत उदभवल्यास पोलिसांच्या मदतीसाठी ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा, अशी सूचनाही त्यांनी केली. एकूणच, पोलीस अधीक्षकानी पर्यटकांना सुरक्षित पर्यटनासाठी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
