नाशिक – हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे मंगळवारी ढगफुटी झाली नसली तरी इगतपुरी तालुक्यात मात्र पावसाने तडाखेबंद बॅटिंग केली आहे. सोमवारी रात्रीपासून इगतपुरी तालुक्यात तो जबरदस्त बरसत आहे. इगतपुरी तालुक्यात २४ तासात पावसाने ‘द्विशतक’ केले. परंतु, एक विक्रम मात्र तो मोडू शकला नाही.
नाशिक जिल्ह्यात जवळपास महिनाभर उशिराने आलेल्या पावसाने सुरुवातीला सर्वांचीच चिंता वाढवली होती; मात्र सोमवारी रात्रीपासून तालुक्यात पावसाने जोरदार सुरुवात केली. रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत म्हणजेच २४ तासात तब्बल २०० मिलीमीटरची (द्विशतक) नोंद झाली. इगतपुरी तालुक्यात मंगळवारपर्यंत एकूण ७२९ मिमी पाऊस झाला. गेल्या वर्षी दोन जुलै रोजी तालुक्यात २४० मिमी असा विक्रमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदाचा आकडा थोडा कमी असल्याने २४ तासातील पावसाचा तो विक्रम अद्याप अबाधित राहिला. इगतपुरी तालुक्यातील नद्या कोरड्याठणक पडल्या होत्या. मात्र, कोसळधारेमुळे नद्यांना पूर आला आहे. दारणा, वाकी, भाम आणि भाम या प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
दरम्यान, या अतिवृष्टीमुळे सखल भागातील भात रोपे पाण्याखाली गेली आहेत. पाण्याचा निचरा न झाल्यास ही रोपे कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. एकाच रात्रीच्या पावसाने तालुक्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी भर घातली आहे: भावली धरण ६३ टक्के भरले असून अवघ्या १२ तासांत तब्बल ३० टक्के पाणीसाठा वाढला आहे. भाम धरणाच्या पाणीसाठ्यात २४ टक्क्यांची वाढ झाली आहे. दारणा धरणाच्या साठ्यात १ टीएमसीने वाढ झाली आहे. भावली धरणाचा जलसाठा वेगाने वाढत असल्याने आणि सुरक्षिततेचा उपाय म्हणून पोलिसांनी पर्यटकांना धरणाकडे जाण्यास तूर्तास बंदी केली आहे.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी खालोखाल सुरगाणा (१४९ मिलीमीटर), त्र्यंबकेश्वर (१२५), सिन्नर (७४), पेठ (६१), दिंडोरी (५८), बागलाण (४७), निफाड (४५), कळवण व देवळा प्रत्येकी (४०) मिलीमीटर पाऊस झाला. नाशिक शहरात २४ तासांत ८४ मिलीमीटर तर, मंगळवारी दिवसभरात २३.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. घाटमाथा भागात सलग कित्येक तास पाऊस कोसळत राहिल्याने नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले. इगतपुरी तालुक्यात जुन्या कसारा घाटात मुंबई-नाशिक मार्गात दरड कोसळली. मातीचा भराव रस्त्यावर आल्याने काही काळ या भागातून एकाच मार्गिकेवरून वाहतूक झाल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात आले. कौटंबी घाटात दगडी बांध कोसळल्याने या ठिकाणी जेसीबी व डंपरद्वारे भराव हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. पहिने-भिलमाळ रस्त्यावर पूल वाहून गेल्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली.
