नाशिक : इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर येथील शासकीय आश्रमशाळेतील सहा विद्यार्थी शाळा सुरू असताना मधल्या सुट्टीत अचानक गायब झाले. गुरुवारी दुपारपासून बेपत्ता असलेल्या या विद्यार्थ्यांचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. अखेर मध्यरात्रीनंतर वैतरणा नदीच्या काठावर झाडाझुडपांमध्ये लपून बसलेली ही मुले आढळून आल्याने यंत्रणेसह पालकांनीही सुटकेचा श्वास सोडला.
इगतपुरी तालुक्यातील वैतरणा नगर येथे शासकीय आश्रमशाळा आहे. शाळेनजीकच्या गावांमधून काही विद्यार्थी शाळेत येतात. गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास शिक्षकांचा डोळा चुकवून पाचवीतील संदीप वारे, सातवीतील राजू बांगारे, रवी बांगारे, सहावीतील भास्कर बांगारे, सातवीतील रस्मा गोरे आणि तेजस वारे हे सहा विद्यार्थी सुरक्षा रक्षकांना गुंगारा देत शाळेतून बाहेर पडले.
दुसरीकडे, नियमित वेळ उलटूनही मुले घरी परतली नाहीत. त्यामुळे नातेवाईक शाळेच्या आवारात पोहोचले. यानंतर मुख्याध्यापकांसह शाळेतील सर्वांचीच धावपळ सुरू झाली. शाळेच्या वतीने पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पालक, नातेवाईक, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी मुलांचा शोध सुरू केला. परिसरात जंगली प्राण्यांचा धोका असल्याने हातात काठ्या घेऊन शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत मुलांचा ठावठिकाणा लागला नाही.
वैतरणा येथून देवगाव येथे जाऊन ही मुले आपल्या घरी जाणार होती. त्यामुळे गावाजवळील तसेच शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही शोधमोहीम सुरू होती. अखेर मध्यरात्रीनंतर वैतरणा नदीच्या काठावर अंधारात झाडाझुडपांचा आधार घेत लपून बसलेली ही मुले आढळून आली.
उसाचे काही कांड्या तोडल्याने प्रकार घडला
शाळेजवळील परिसरात एका व्यक्तीने उसाची शेती केली आहे. गुरुवारी मधल्या सुट्टीत ही मुले शाळेबाहेर पडली. त्यातील काही मुलांनी शेतातील ऊस तोडला. यामुळे जागामालकाने मुलांना धमकावले. शिक्षक आणि पालकांना याबाबत सांगणार असल्याचे त्याने म्हटले. त्यामुळे घाबरलेली मुले तेथून निघून गेली. जागामालकाने शाळेत येऊन हा प्रकार सांगितल्यानंतर मुले शाळेतून बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. याबाबत पालक, पोलीस तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली, असे शासकीय आश्रमशाळा मुख्याध्यापक जगदीश गायकवाड यांनी सांगितले.
निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
शासकीय आश्रमशाळेत पहिली ते दहावीचे वर्ग भरतात. काही विद्यार्थी निवासी आहेत. मात्र, शाळेला अद्याप पुरेशी इमारत नाही. निवासी विद्यार्थ्यांना जमिनीवरच दाटीवाटीने झोपावे लागते. शिक्षक किंवा अन्य अधिकारीही निवासस्थानी राहत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून, त्यांची सुरक्षा ‘रामभरोसे’ असल्याची स्थिती आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे असे एल्गार कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांनी म्हटले आहे.
