नाशिक : भारतात अवैधरित्या घुसखोरी करून राहणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना नाशिक शहर पोलिसांनी अटक केली. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पेठ रस्त्यावरील नवनाथनगर भागात ही कारवाई केली. या दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे, नावे बदलून नाशिकात बस्तान बसविल्याचे तपासात निष्पन्न झाले. या घुसखोरीत मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.

मोहम्मद मुशर्रफ हुसेन मुजीर्बुरहमान खोकन आणि मोहम्मद सज्जत हुसेन आशिक (दोघेही मीजीबाडी, खेजुतल, पोस्ट मुरादपूर, ता. सोमोहनी, बेगमगंज पोलीस ठाणे, जिल्हा नोवाखाली, बांगलादेश) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची मूळ नावे आहेत. ते अनुक्रमे रोनी अब्दुल शेख (३२) आणि आशिक अलीअकबर अन्सारी (२२) अशी नावे धारण करून पंचवटीतील नवनाथनगर भागातील शिंदे चाळीत वास्तव्यास होते.

युनिट एकचे हवालदार प्रवीण वाघमारे व विशाल देवरे यांना गुप्त बातमीदारामार्फत या संदर्भात माहिती मिळाली. नवनाथनगर भागात बांगलादेशी व्यक्ती अवैधरित्या घुसखोरी करून राहत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्याआधारे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण व सहायक पोलीस आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी पथकाने छापा टाकून दोघांना पकडले.

घरझडतीत संशयित बांगलादेशी असल्याचे पुरावे हाती लागले. त्यात पारपत्र, मतदान कार्ड व अन्य कागदपत्रांचा समावेश आहे. यावेळी त्यांच्याकडे सापडलेले आधार कार्ड व पॅनकार्ड बनावट असल्याचे तपासात निष्पन्न झाले. संशयितांकडे वैध प्रवासी कागदपत्रे मिळून आली नाहीत. चौकशीत संशयितांनी भारत-बांगलादेश सीमेवरून अवैध मार्गाने घुसखोरी केल्याची कबुली दिल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले.

या मागे मोठे रॅकेट असल्याचा संशय व्यक्त होत असून त्या दृष्टीने पोलीस तपास सुरू आहे. संशयितांना पाठबळ देणाऱ्यांसह घरमालकाची चौकशी केली जात आहे. ही कारवाई युनिटचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रेय पोटे, रमीज शेख, राम शिंदे, किरण शिरसाठ, जमादार कैलास चव्हाण, योगीराज गायकवाड, राजेश लोखंडे, हवालदार देविदास ठाकरे, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, रवींद्र आढाव, महेश साळुंके, संदिप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी आदींच्या पथकाने केली.