नाशिक : काही दिवसांपासून शहर तसेच जिल्ह्यात ऊन- पावसाचा खेळ सुरू आहे. कुठे मुसळधार तर कुठे रिमझीम होत असल्याने बदलत्या वातावरणाचा फटका नागरिकांना बसत आहे. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असा त्रास सुरू झाला आहे. साथीच्या आजारांनी डोके वर काढले असल्याने सध्या रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यापासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत आहे. मागील आठवड्यात मुसळधार पावसाने शहर परिसरात दैनंदिन जीवनमान विस्कळीत झाले होते.

सततच्या पावसामुळे झाडांचा पालापाचोळा कुजत असून वातावरणात दुर्गंधीयुक्त दर्प जाणवत आहे. नळांव्दारे पिण्याचे पाणीही गढूळ येत आहे. वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, उलट्या, जुलाब असा त्रास होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. मागील महिन्याच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने दवाखाने, रुग्णालयांमध्ये अधिक गर्दी जाणवत आहे. याविषयी जिल्हा आरोग्य विभागाचे अतिरिक्त अधिकारी डाॅ. राजेंद्र बागूल यांनी माहिती दिली. काही दिवसांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याने याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण, दुषित पाण्यामुळे उलट्या, जुलाब होणे असा त्रास होत आहे. जिल्ह्यातील वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांमध्ये तापामुळे ४९५० रुग्ण दाखल असून सर्दी, खोकल्याचे ३,७१३, दुषित पाण्यामुळे जुलाबाचा त्रास जाणवणाऱ्या रुग्णांची संख्या ५१६ असल्याची माहिती देण्यात आली.वातावरणातील बदल पाहता नागरिकांनी वेळेत औषधोपचार घ्यावेत, सर्दी, ताप जाणवल्यास डेंग्यु, मलेरियाची तपासणी करुन घ्यावी, लोकांनी उबदार वातावरणात राहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, पावसात भिजू नये तसेच घराबाहेर पडतांना मुखपट्टीचा वापर करावा, असे आवाहन डाॅ. बागूल यांनी केले.