नाशिक: अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातील संघर्षाचा फटका हळूहळू भारताला बसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऊर्जा पुरवठा साखळीवर तणावाचा स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. एलपीजी (व्यावसायिक गॅस), पीएनजी आणि औद्योगिक गॅस पुरवठ्यावर परिणाम जाणवत असून नाशिकमधील औद्योगिक क्षेत्रालाही त्याची झळ बसू लागली आहे. परिस्थिती अजून आठवडाभर अशीच कायम राहिल्यास नाशिकमधील सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील शेकडो कंपन्यांना उत्पादन बंद ठेवण्याच्या संकटाला सामोरे जावे लागण्याचा धोका निर्माण झाला आहे.
.
नाशिक जिल्ह्यातील अंबड आणि सातपूर या औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कंपन्या आहेत. गॅस पुरवठादार कंपन्यांकडून उद्योजकांना अधिकृत ई-मेल पाठविण्यात आला आहे. त्याव्दारे अनिश्चित काळासाठी गॅस पुरवठा सुरळीत होऊ शकणार नसल्याचे सुचित करण्यात आले आहे. यासंदर्भात नाशिक इंडस्ट्रियल ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (निमा) अध्यक्ष आशिष नहार यांनी सरकारने अत्यावश्यक सेवेसाठीच गॅसचा वापर करण्याचे आदेश दिल्याने औद्योगिक क्षेत्रासाठी परिस्थिती बिकट झाल्याचे सांगितले. सध्या नाशिक औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडे चार ते पाच दिवस पुरेल इतकाच गॅसचा साठा आहे. प्लेटिंग, पावडर कोटिंग यासारख्या कामात गॅसचा अधिक वापर होतो. गॅस पुरवठा न झाल्यास शेकडो कंपन्यांवर थेट परिणाम होऊ शकतो.
परंतु, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष गॅस न मिळण्यामुळे नुकसान होणाऱ्या कंपन्यांची संख्या हजारावर आहे. कंपन्या बंद पडल्यास कामगारांना घरी बसण्याची वेळ येईल. अशी वेळ येऊ नये, यासाठी काही प्रमाणात का असेना कंपन्यांना गॅस पुरवठा सुरु ठेवण्यात यावा, अशी विनंती जिल्हाधिकाऱ्यांना करणार असल्याचे नहार यांनी नमूद केले.
अंबड इंडस्ट्रियल ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (आयम) अध्यक्ष राजेंद्र पानसरे यांनीही गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीविषयी चिंता व्यक्त केली. युद्धामुळे भारतात गॅस टंचाई निर्माण झाल्याने उद्योगाला मोठा फटका बसला आहे. हिट ट्रीटमेंट आणि पावडर कोटिंग करणारे ३५० ते ४०० उद्योग दोन ते तीन दिवसात एलपीजी गॅस न मिळाल्यास बंद होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मोठ्या उद्योगांना सुट्या मालाचा पुरवठा होऊ शकणार नाही. परिणामी, उद्योजकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. या उद्योगांवर अवलंबून असणाऱ्या कामगार वर्गावर विपरीत परिणाम होऊन कामगार स्थलांतरित होण्याची भीती आहे. भविष्यात कुशल कामगार मिळण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते, असेही राजेंद्र पानसरे यांनी नमूद केले.
गॅस टंचाई कायम राहिल्यास नाशिकच्या सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीतील शेकडो छोट्या-मोठ्या कंपन्यांवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. गॅसच्या किंमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. एलपीजीच्या दरात प्रति किलो ३६ रुपयांची वाढ झाली आहे. या दरवाढीनेही व्यावसायिक आणि उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. परिस्थिती लवकर न निवळल्यास उद्योग कसे वाचवावेत, असा प्रश्न उद्योजकांसमोर आहे.
