नाशिक: राज्य सरकार कुंभमेळ्यासाठी ३३ हजार कोटींची गुंतवणूक करीत आहे. कुंभमेळा हा आर्थिक विकासाचा चालक ठरणार आहे. नाशिक जिल्हा औद्योगिक आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने तयार होत आहे. भाविकांच्या सोयी सुविधांसाठी केलेली गुंतवणूक पुढील दशकभरात नाशिकमध्ये तीन लाख कोटींची अर्थव्यवस्था निर्माण करेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
उद्योग विभागाच्यावतीने येथे आयोजित कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत ३०० हून उद्योजकांशी १३ हजार १९० कोटींचे सामंजस्य करार करण्यात आले. यातून ३२ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यातील कामांमुळे नाशिकची प्रगती आता कुणाला रोखता येणार नसल्याचे स्पष्ट केले. पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हीटीचा सर्व क्षेत्रांना लाभ होईल. जिल्हा गुंतवणूक परिषदेतून मागील तीन वर्षात ३१ हजार ९४५ कोटींची गुंतवणूक झाली. त्यातून ६६ हजार रोजगार निर्मिती झाली.
सामंजस्य करारांपैकी ७७ टक्के करार प्रत्यक्षात आले असून हे कागदावरचे करार नसल्याचा टोला त्यांनी विरोधकांना हाणला. अनेक मोठे उद्योग समूह नाशिकमध्ये गुंतवणूक करीत आहेत. नाशिकमध्ये जागतिक क्षमता केंद्र अर्थात जीसीसी स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. योग्य दरात व वेळेत जागेची व्यवस्था झाल्यास गुंतवणुकीची कमतरता नाही. महिंद्रा उद्योग समूहाला ठरलेली जागा लवकर सुपूर्द केल्यास भूमीपूजन होऊन त्या प्रकल्पाचे काम सुरू होईल, असे फडणवीस यांनी सूचित केले.
नाशिक जिल्ह्यातही अनेक उद्योग समूहानी गुंतवणुकीत स्वारस्य दाखवले असून त्यासाठी त्यांना आवश्यक जमीन उपलब्ध होणे गरजेचे आहे. महिंद्रा अँड महिंद्रा सारखी कंपनी नाशिकमध्ये गुंतवणूक करत आहे, या शिवाय, रिलायन्स, एल ॲण्ड टीसह अनेक उद्योगांनी गुंतवणूक केली आहे. उद्योग विस्तारासाठी अनेक इच्छुक आहेत. गेल्या दोन वर्षात ५७ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक नाशिकसाठी आली असून दावोस येथे झालेल्या परिषदेत नाशिक जिल्ह्यासाठी १२ हजार कोटींची गुंतवणूक राज्य शासनाने आणली. राज्यात आता उद्योगाचे नवीन मॅग्नेट तयार झाले आहेत. विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नाशिक हे उत्तर महाराष्ट्रामध्ये नवे मॅग्नेट तयार झाले आहे. अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार हेही उद्योगासाठी गुंतवणुकीचे ग्रोथ इंजिन होत आहेत. कुंभमेळासाठी राज्य शासनाने केलेली गुंतवणूक पुढील १५-२० वर्ष उद्योगासाठी मॅग्नेटच काम करेल. यामुळे निर्माण झालेल्या दळणवळण सुविधा, ड्राय पोर्ट, पायाभूत सुविधा, नाशिक रिंगरोड आदींमुळे पुढील १० वर्षात तीन लाख कोटींची अर्थव्यवस्था नाशिक जिल्ह्यात तयार होईल. कुंभमेळा विकासाच्या दृष्टीने परिवर्तन करणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
कुंभमेळ्यात पर्यावरणाकडेही लक्ष
कुंभमेळ्यासाठी गोदावरी शुध्दीकरण, सांडपाणी प्रक्रिया केंद्र व पर्यावरणाशी संबंधित अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत. परंतु, काही घटक कुंभमेळ्यात पर्यावरणाचा विचार होत नाही, झाडे कापण्याची मानसिकता आहे, असे कथानक तयार करीत असून ते चुकीचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखत कार्बन ‘फूटप्रिंट’ कमी करणारी आणि शाश्वत विकासावर भर देणारी कुंभमेळ्याची रचना करण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
