नाशिक: उन्हाळ्यात पाण्यासाठी कायमच मागणी होत असते. उन्हाळ्यात टंचाई निर्माण होत असल्याने पिके जगविणार कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. कारण, विहिरी, तलाव असे पाण्याचे स्त्रोत कोरडे पडतात. अशावेळी शेतकऱ्यांना धरणांमधील पाणीसाठ्याचा आधार असतो. धरणांमधून निघणाऱ्या कालव्यांव्दारे पाणी पुरवठा करण्यात येतो. शासन धोरणानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध असलेले पाणी हे उन्हाळी हंगामाअखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरीत पाण्यात शेतीच्या पिकासाठी व औद्योगिक कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शेतीसाठी पाणी हवे असल्यास शेतकऱ्यांना २४ मार्चपर्यंत अर्ज करावा लागणार आहे.

नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रातील गोदावरी उजवा तट कालवा, गोदावरी डावा तट कालवा, गंगापूर डावा तट कालवा, आळंदी डावा व आळंदी उजवा तट काला, पालखेड उजवा तट कालवा इत्यादी लाभक्षेत्र तसेच दारणा, गंगापूर, मुकणे, भावली, वाकी, भाम, कडवा, वालदेवी, गौतमी-गोदावरी, काश्यपी व आळंदी या धरणांच्या जलाशयातून तसेच दारणा, गोदावरी, कडवा व आळंदी नदीचा भाग, गोदावरी नदीवरील या विभागाच्या अधिपत्याखालील एकूण १० कोल्हापूर बंधारे या ठिकाणाहून उपसा सिंचन पद्धतीने पाणी घेवू इच्छिणाऱ्या लाभधारक शेतकरी व संस्थांना पुरवठा करण्यात येणार आहे.

संबंधित लघु प्रकल्पात उपलब्ध असणारे पाणी, यातून बिगर सिंचन आरक्षीत पाणी तसेच भविष्यात बिगर सिंचन आरक्षणात वाढ झाल्यास तो पाणीसाठा, बाष्पीभवन व इतर अनिवार्य वापर इत्यादी वजा जाता सिंचनासाठी उपलब्ध पाणी विचारात घेवून नमुना नंबर ७ वर विहिरीच्या पाण्याची जोड असलेल्या सिंचन क्षेत्रास उन्हाळ हंगाम २०२५-२६ मध्ये उन्हाळी हंगामी पिके, चारा पिके आणि बारमाही उभी पिके, ऊस व फळबाग इत्यादींना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे.

वरील प्रकल्पांत शासन धोरणानुसार धरणातील उपलब्ध असलेले पाणी हे उन्हाळी हंगामा अखेर पुरवावे लागणार असल्याने प्रथम पिण्याच्या पाण्याची गरज भागवून उर्वरीत पाण्यात शेतीच्या पिकासाठी व औद्योगिक कारखान्यांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. शेतीसाठी उपलब्ध होणाऱ्या पाण्यात पाणीपुरवठा करताना आर्वतन कालावधीत कमी जास्त अंतर करून पुरवावे लागते, यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा व सूक्ष्म सिंचनावर अधिक भर द्यावा. पिकांना काही कारणास्तव कमी- अधिक पाणी मिळून नुकसान झाल्यास याबाबत कोणतीही नुकसान भरपाई शासनाकडून व पाटबंधारे विभागाकडून देण्यात येणार नाही. याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घेवूनच अर्ज दाखल करावेत.

शेतकरी व पाणी वापर संस्थांनी २४ मार्च रोजी सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत आपले अर्ज नजीकच्या सिंचन शाखा कार्यालयात सादर करावे व रितसर पोहोच घ्यावी, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांनी केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी नजीकच्या सिंचन शाखेशी संपर्क साधावा, असेही कार्यकारी अभियंता शहाणे यांनी कळविले आहे.