नाशिक – नावाजलेल्या टीसीएस कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण, विनयभंग व धर्मांतराचा प्रयत्न असे प्रकार घडल्याने नाशिकच्या आयटी अर्थात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या क्षेत्रात वाढत्या स्पर्धेबरोबरच कार्यस्थळी सुरक्षितता, सन्मान आणि नैतिक मूल्ये जपणे ही काळाची गरज बनली आहे. नाशिक आयटी असोसिएशनच्या (निटा) सातपूर येथे झालेल्या विशेष बैठकीत यावर विचार विनिमय करण्यात आला. भारतीय संस्कृती, शिष्टाचार आणि व्यावसायिक मूल्यांवर आधारित सक्षम व सुदृढ कार्यसंस्कृती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

नाशिक आयटी असोसिएशनचे अध्यक्ष अमर ठाकरे, भाजपचे प्रदीप पेशकार, नेटविन सोल्यूशन्सचे अरविंद महापात्रा आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस आयटी क्षेत्रातील अनेक उद्योजक ऑनलाईनही सहभागी झाले होते. टीसीएस कंपनीतील घटनाक्रमाने सामान्यांना धक्का बसला आहे. निटा संस्थेचे अध्यक्ष अमर ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यात सध्या २५० च्या आसपास आयटी कंपन्या कार्यान्वित असून तिथे १५ ते १८ हजार कर्मचारी कार्यरत असल्याचे नमूद केले.

यातील ४० ते ५० टक्के प्रमाण महिलांचे आहे. नामांकित कंपनीत जो प्रकार घडला, तसे कुठेही घडू नये, या दृष्टीने संघटना आतापासून दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाय योजना करीत आहे. बैठकीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक संस्थेत पॉश (लैंगिक छळ प्रतिबंध) नियमांची काटेकोर अंमलबजावणी, विशाखा समितीचे सक्रिय करणे अनिवार्य करणे, यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यस्थळी सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण निर्माण करण्यासाठी वैयक्तिक मर्यादा आणि सीमारेषा याबाबत मार्गदर्शन, मौखिक व शारीरिक संकेत तसेच संभाव्य धोक्याचे संकेत ओळखण्याचे प्रशिक्षण, अनुचित प्रकार त्वरित वरिष्ठांना कळवण्याबाबत जागरुकता यावर भर दिला जाईल. यासोबतच अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थिनींसाठी जनजागृती उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सकारात्मक व संतुलित कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी पुरूष कर्मचाऱ्यांनाही संवेदनशीलता प्रशिक्षण देण्याची गरज अधोरेखीत करण्यात आली.

नाशिक आयटी असोसिएशनचे माजी अध्यक्ष मकरंद सावरकर यांनी कार्यक्षेत्रात प्रगती साधताना मूल्यांचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे. भारतीय संस्कार आणि व्यावसायिकतेचा योग्य संगम साधल्यासच सुरक्षित, सुसंस्कृत आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण होऊ शकते. असा विश्वास व्यक्त केला. तर भाजपचे प्रदीप पेशकार यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना आणि जनजागृती ही काळाची गरज आहे. नाशिकचे आयटी क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.

सुलभ, प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था

आयटी कंपन्यांमध्ये नवीन तसेच महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि आत्मविश्वासपूर्ण वातावरण मिळावे यासाठी प्रारंभीचे मार्गदर्शन, सुलभ व प्रभावी तक्रार निवारण व्यवस्था, स्पष्ट व विश्वासार्ह संवाद प्रणाली यांची अंमलबजावणी अधिक बळकट करण्यात येणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार जबाबदाऱ्या देणे आवश्यक असून, त्यापलीकडे होणारे अनावश्यक काम, दबाव किंवा शोषण ओळखण्यासाठी जागरूकता निर्माण केली जाईल.

प्रत्येक आयटी कंपनीच्या कार्यालयात पोलीस प्रशासन, समाजसेवक व ज्येष्ठ पत्रकार यांचे संपर्क क्रमांक दर्शनी भागात प्रदर्शित करणे बंधनकारक राहील, जेणेकरून गरज भासल्यास कर्मचारी कोणत्याही भीतीशिवाय मदत घेऊ शकतील. पाश्चात्य कार्यपद्धतीचा अवलंब म्हणजे स्वैराचार नव्हे. आधुनिक व्यावसायिकतेसोबतच भारतीय संस्कृती, नैतिक मूल्ये आणि शिष्टाचार जपणे तितकेच आवश्यक आहे, असा दृष्टिकोन बैठकीत मांडण्यात आला.