नाशिक – नाशिक शहरात मागील दोन महिन्यांपासून होणाऱ्या घटनांमुळे नाशिकमध्ये चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिकसारख्या धार्मिक नगरीत महिलांचे लैंगिक शोषण, एका धर्माच्या जाळ्यात ओढण्यासाठी होणारे प्रयत्न, असे प्रकार होत असल्याचे उघड झाल्याने सर्वच हादरले आहेत. नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरण तर भयंकरच म्हणावे लागेल.

या प्रकरणात दररोज वेगवेगळी माहिती पुढे येत आहे. या प्रकरणाती संशयितांचा कंपनीत काम करण्याचा हेतू केवळ पैसे कमविणे हा नव्हता, तर ते वेगळ्याच हेतूने काम करीत असल्याचे उघड होऊ लागले आहे. विशेष म्हणजे, हे संशयित सुटी झाल्यानंतरही कंपनीत थांबून संशयास्पद वर्तन करीत असल्याची माहिती पुढे आली आहे.

नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील महिलांचे लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतरण प्रकरणाचा तपास एसआयटीकडून करण्यात येत आहे. नामांकित कंपनीत इतक्या दिवसांपासून असे प्रकार होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. संशयितांनी २०२२ पासूनच कंपनीत कट्टर धार्मिकता रुजविण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी त्यांनी गरजू मुलींना लक्ष्य केले. कंपनीच्या कामाच्या नावाखाली कंपनीच्या मालमत्तेचा संशयितांनी मोठ्या चलाखीने वापर करुन घेतला.

महिला कर्मचाऱ्यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यासाठी ते वेगवेगळे उपाय करीत असत. आपले धार्मिक कट्टरतेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संशयित काम संपल्यावरही बराच वेळ घरी जात नव्हते. सुटी झाल्यानंतरही कंपनीतच थांबून कंपनीचे काम करीत असल्याचे भासवित संशयास्पद प्रकार करीत असत, अशी माहिती एसआयटीच्या हाती लागल्याचे सांगितले जाते. कंपनीमधील संशयितांच्या बँक खात्यांची देखील एसआयटीकडून चौकशी करण्यात येत आहे.

दुसरीकडे, या प्रकरणातील महत्त्वाची संशयित आणि कंपनीची एजीएम महिला ही मुख्य संशयिताच्या कायम संपर्कात होती, असे दोन वर्षांतील काॅल रेकाॅर्डवरुन पुढे आले आहे. त्यांच्यात ३८ वेळा संभाषण झाल्याची माहिती आहे. पीडितांकडून तक्रार करण्यात आल्यावरही या संशयित महिलेने पीडितांनाच उलट “तुमको क्या हायलाईट होना है? ” असे धमकाविल्याचे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे. एकिकडे अशोक खरातला वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये न्यायालय ते पोलीस कोठडी, कारागृह अशा फेऱ्या माराव्या लागत आहेत. कथित पत्रकार रवींद्र एरंडेवरही तीच वेळ आली आहे. खरात आणि एरंडे ही दोन्ही प्रकरणे कमी की काय, म्हणून बुहराष्ट्रीय आयटी कंपनीतील प्रकरण बाहेर आले. आणि सर्वच हादरले. बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळावी, असे युवावर्गाचे स्वप्न असते. अशा कंपनीतील नोकरी म्हणजे चांगले वेतन आणि योग्य सुविधा, असा समज असतो. परंतु, अशा काही कंपन्यांमध्ये काय काय घडते, हे नाशिकच्या घटनेवरुन पुढे आले आहे. नाशिकच्या बहुराष्ट्रीय कंपनीतील प्रकरण सर्वांनाच विचार करावयास लावणारे आहे.