नाशिक – टीसीएस कंपनीच्या नाशिक प्रकल्पात घडलेल्या घटनांचा परिणाम नाशिकच्या उभारी घेऊ पाहणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नव्या गुंतवणुकीवर होण्याची भीती आयटी क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. ज्या कंपनीत हा प्रकार घडला, त्या कंपनीने नाशिक प्रकल्प बंद करून तो इतरत्र स्थलांतरीत करू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत.

नावाजलेल्या टीसीएस बहुराष्ट्रीय कंपनीच्या नाशिक प्रकल्पात महिलांचा विनयभंग, लैंगिक व मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे, धर्मांतराचा प्रयत्न आदी घटना घडल्याचे अलीकडेच समोर आले. या प्रकरणी नऊ गुन्हे दाखल असून पोलिसांनी सात संशयितांना अटक केलेली आहे. टीसीएससारख्या कंपनीत घडलेल्या धक्कादायक घटनांची आयटी क्षेत्रासह विविध क्षेत्रात चर्चा होत आहे. टीसीएस या नामांकित कंपनीतील घटनाक्रमानंतर नाशिकच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रावर चिंतेचे मळभ दाटले आहेत.

मध्यंतरी काही वर्ष विमान सेवेअभावी नाशिकच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळाली नव्हती. नाशिकहून देशातील अनेक भागांशी हवाई संपर्क दृष्टीपथास आल्यामुळे आता वाहन, इलेक्ट्रिक उद्योगांचे हे केंद्र माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही नावारुपास येईल, या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले. आयटी पार्क, आयटी उद्योगासाठी राखीव जागा आदींचे नियोजन प्रगतीपथावर आहे. टीसीएस कंपनीतील घटनेमुळे त्यास झटका बसल्याचे मानले जाते.

नाशिक आयटी संघटना अर्थात निटाचे अध्यक्ष अमर ठाकरे यांनी त्यास दुजोरा दिला. नाशिक जिल्ह्यात सध्या २५० च्या आसपास आयटी कंपन्या कार्यरत असून तिथे साधारणत: १५ ते १८ हजार कर्मचारी काम करतात. यामध्ये ४० ते ५० टक्के प्रमाण महिलांचे आहे. नामांकित कंपनीत जो प्रकार घडला, तसे इतरत्र कुठेही घडू नये, या दृष्टीने संघटना आतापासून दक्षता घेण्याच्या दृष्टीने उपाययोजना करीत आहे.

काय घडू शकते ?

निटा संघटना नाशिकमध्ये अनेक नव्या गुंतवणुकदारांना आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. टीसीएसमधील घटनेमुळे त्यास स्थगिती मिळू शकते. काही कंपन्या पाठ फिरवू शकतात. टीसीएस नाशिक प्रकल्प बंद करून कर्मचाऱ्यांना इतरत्र स्थलांतरीत करण्याच्या विचारात असल्याची माहिती आहे. तसे घडू नये म्हणून संघटना विविध पातळीवर चर्चा करीत असल्याचे ठाकरे यांनी सूचित केले.

​गुंतवणुकीला खिळ?

​नाशिकमध्ये आयटी हब साकारण्यासाठी सध्या अनुकूल वातावरण असतानाच टीसीएसमधील गंभीर प्रकारामुळे गुंतवणुकीवर अनिष्ट परिणाम होण्याची भीती आहे. येथील २५० आयटी कंपन्यांमध्ये हजारो महिला कर्मचारी कार्यरत आहेत. या घटनेमुळे नव्या कंपन्या नाशिकऐवजी इतर शहरांना पसंती देऊ शकतात. आयटी क्षेत्राची ही प्रतिमा सावरणे आणि विश्वासार्हता टिकवणे आता स्थानिक उद्योजकांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.