नाशिक – दहावीनंतर पुढे काय? या प्रश्नाचे उत्तर म्हणून बऱ्याचदा कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसह तंत्रनिकेतनचा पर्याय निवडला जात आहे. मात्र, मळलेल्या वाटा सोडत मागील काही वर्षांत औद्योगिक प्रशिक्षणाकडे काहींचा कल राहिला. यंदा मात्र या प्रशिक्षण वर्गास संमिश्र प्रतिसाद लाभला आहे. नव्या अभ्यासक्रमांत ६० टक्क्यांहून अधिक प्रवेश झाले असून, अन्य काही अभ्यासक्रमांना प्रशिक्षणार्थींची प्रतीक्षा कायम आहे.

मागील काही वर्षांपासून दहावीनंतर पालक तसेच विद्यार्थ्यांकडून करिअर आणि रोजगाराच्या संधींच्या अनुषंगाने विविध पर्यायांची चाचपणी करण्यात येते. यासाठी पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान शाखेसह तंत्रनिकेतनच्या विविध पर्यायांचा विचार आपल्या आर्थिक तसेच बौद्धिक क्षमतेच्या अनुषंगाने होतो. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षणाला पसंती मिळत होती. प्रशिक्षण करताना प्रत्यक्ष शिक्षणावर भर दिला जात असल्याने औद्योगिक प्रशिक्षणातील टर्नर, फिटर, मेकॅनिकल या शाखांना पसंती राहिली. ॲप्रेंटिसशिपमुळे प्रत्यक्ष कामाची संधी आणि त्या माध्यमातून मिळणारे हक्काचे काम यामुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या लक्षणीय राहिली. यामध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेले विद्यार्थीही प्रशिक्षणार्थी होते. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहता एरॉनॉटिकल स्ट्रक्चर ॲण्ड इक्विपमेंट फिटर, मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर टेक्निशियन – इलेक्ट्रिकल, आयओटी टेक्निशियन – स्मार्ट सिटी हे नवे अभ्यासक्रम मागील वर्षी सुरू करण्यात आले.

प्रवेशस्थिती काय ?

सध्या नाशिक विभागाचा विचार केला तर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर येथे ६८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. तसेच १४८ खासगी संस्था आहेत. विभागातील २१६ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सध्या २८,०४८ जागांपैकी १५,२०९ प्रशिक्षणार्थींनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. यामध्ये एरॉनॉटिकल, मेकॅनिक इलेक्ट्रिक व्हेईकल, सोलर आणि आयओटी अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची पसंती जास्त असून, एरॉनॉटिकलचे प्रमाण १०० टक्के, मेकॅनिकसाठी ८७ टक्के, सोलरसाठी ८५ टक्के, तर आयओटीसाठी ६६.६७ टक्के प्रवेश झाले आहेत. अन्य अभ्यासक्रमांसाठी प्रशिक्षणार्थींची प्रतीक्षा कायम आहे. याची कारणे शोधण्याचे काम सुरू असून, विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या अभ्यासक्रमांविषयी प्रबोधन करण्यात येत आहे. प्राचार्यांकडून अभ्यासक्रमाच्या प्रसिद्धीसाठी निधी उपलब्ध न झाल्याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल बदलत असल्याने यंदा औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेस संमिश्र प्रतिसाद लाभला आहे.

प्रवेशाबाबत आवाहन

शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील संस्थास्तरीय प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू असून, नाशिक विभागातील ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही, त्यांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता आपल्या जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये संपर्क साधून संस्थास्तरीय प्रवेश निश्चित करावा असे आवाहन सहसंचालक अनिल गावित यांनी केले आहे.