नाशिक – भारतीय रेल्वेच्या वेगाने सुरू असलेल्या विद्युतीकरणाच्या पार्श्वभूमीवर, भविष्यात ओव्हरहेड ट्रॅक्शन लाईनच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळाची गरज लक्षात घेऊन विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ‘आयटीआय’च्या विद्यार्थ्यांना आता ट्रॅक्शन लाईनचे विशेष कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार असून, देशभरातील या पहिल्या पथदर्शी प्रकल्पासाठी नाशिक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे.

मागील काही वर्षांत भारतीय रेल्वेच्या वतीने रेल्वेचे विद्युतीकरण वेगाने सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून रेल्वेचे १०० टक्के विद्युतीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रेल्वेच्या १०० टक्के विद्युतीकरणाच्या उद्दिष्टामुळे येत्या काळात उच्चदाबाच्या ट्रॅक्शन लाईनवरील कामासाठी प्रशिक्षित तंत्रज्ञांची मोठी गरज भासणार आहे. २५ हजार व्होल्ट (२५ केव्ही) एवढ्या उच्च दाबावर काम करावे लागत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष प्रशिक्षण घेतलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते.

ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला. प्रस्तावानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या ‘स्किल्ड मॅनपावर डेव्हलपमेंट’ उपक्रमांतर्गत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना या संदर्भात प्रशिक्षण देण्याचा निकष ठेवण्यात आला. या अनुषंगाने नाशिक येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची निवड करण्यात आली आहे.

पुढील टप्प्यात इलेक्ट्रिशियन आणि वायरमन ट्रेडमधील विद्यार्थ्यांना आयटीआयमध्ये शिक्षण घेत असतानाच २५० तासांचे (अडीच ते तीन महिने) विशेष अल्पकालीन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे आयटीआय पूर्ण करून बाहेर पडणारे विद्यार्थी थेट रेल्वेमध्ये किंवा कंत्राटदारांकडील देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी सज्ज असतील. यामुळे कामाचा वेग आणि गुणवत्ता वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दुसरीकडे, हे अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय रेल्वेच्या एकलहरे येथील ‘इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट फॉर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ (आयरीन) या संस्थेच्या मदतीने नाशिक आयटीआयमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. यासाठी अंदाजे ५० ते ६० लाख रुपयांचा निधी रेल्वे व ‘आयरीन’मार्फत पुरवला जाईल, अशी माहिती उपसंचालक रवींद्र मुंडासे यांनी दिली.

दरम्यान, या उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणून नाशिक व दिंडोरी परिसरातील १२ आयटीआय शिक्षकांची पहिली तुकडी सध्या एकलहरे येथील ‘आयरीन’मध्ये एक महिन्याचे प्रशिक्षण घेत आहे. हे प्रशिक्षित शिक्षक आयटीआयच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. विद्यार्थ्यांची पहिली तुकडी येत्या नोव्हेंबर किंवा जानेवारी महिन्यापासून सुरू करण्याचे नियोजन आहे.

ट्रॅक्शन लाईनच्या देखभालीसाठी मनुष्यबळाची गरज

रेल्वेच्या वेगाने होणाऱ्या विद्युतीकरणामुळे ट्रॅक्शन लाईनच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण मिळाल्यास त्यांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. नाशिकमधील हा पायलट प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर तो देशभरात टप्प्याटप्प्याने राबवला जाईल.— रवींद्र मुंडासे, उपसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण