नाशिक – मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील १५६ ‘हायड्रॉलिक’ आणि ‘वॉटर वे’ (जलवाहिनी) पुलांचा वापर पादचारी, मोटारसायकल, ट्रॅक्टर आणि बैलगाड्या रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी वारंवार करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ५३ आणि जळगाव जिल्ह्यातील ७१ हायड्रॉलिक पुलांचा समावेश आहे. या पुलांचा वापर रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी (रोड क्रॉसिंग म्हणून) करणे अत्यंत धोकादायक असून ते त्वरित थांबवावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

‘हायड्रॉलिक’ आणि ‘वॉटर वे’ पूल हे केवळ पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधण्यात आले आहेत. हे पूल सार्वजनिक वाहतूक किंवा नागरिकांच्या येण्या-जाण्यासाठी अजिबात बांधलेले नसून त्या उद्देशासाठी ते नसल्याचे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने स्पष्ट केले आहे. या पुलांचा अनधिकृत वापर अत्यंत धोकादायक असून यामुळे मानवी जीवाला मोठा धोका निर्माण होतो.

मुसळधार पावसाच्या दिवसात या पुलाखालील भागात पाणी पातळी कोणतीही पूर्वसूचना न मिळता अचानक वाढू शकते. यामुळे गंभीर किंवा जीवघेणे अपघातांची, बुडण्याची किंवा वाहने वाहून जाण्याची तीव्र शक्यता असते, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. भुसावळ विभागाने आपल्या कार्यक्षेत्रात अशा १५६ हायड्रॉलिक पुलांची ओळख पटवली आहे, जिथे अनधिकृत घुसखोरी होत असल्याचे दिसून आले आहे, जे सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आणि रेल्वेच्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक आहे.

हेही वाचा

जिल्हानिहाय सर्वेक्षणानुसार, जळगाव जिल्ह्यात ७१ आणि नाशिकमध्ये ५३, बुलढाण्यात १७, खंडवामध्ये ११ आणि अकोला व अमरावतीमध्ये प्रत्येकी २ संवेदनशील ठिकाणे आढळली आहेत. हे पूल अधिकृत रस्ता ओलांडण्याची ठिकाणे नाहीत. ते केवळ पाण्याचा निचरा करण्यासाठी आहेत. रेल्वे प्रशासनाने सर्व संवेदनशील ठिकाणी कायमस्वरूपी इशारा फलक लावण्याचे काम सुरू केले आहे. स्थानिक प्रशासनाने आसपासच्या गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवावी. जीवित किंवा वित्तहानी टाळण्यासाठी कडक अंमलबजावणी सुनिश्चित करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

‘या’ पुलांचा वापर करा

रेल्वे मार्ग ओलांडण्यासाठी केवळ अधिकृत रोड ओव्हर ब्रिज (आरओबी) रोड अंडर ब्रिज (आरयुबी) रेल्वे गेट (लेव्हल क्रॉसिंग) आणि फूट ओव्हर ब्रिज (एफओबी) यांचाच वापर करावा. काही मिनिटे वाचवण्यापेक्षा जीव वाचवणे अधिक महत्त्वाचे आहे, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

तुरुंगवास, दंडाची शिक्षा

या प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणे हा एक गंभीर गुन्हा आहे. रेल्वे कायद्यांतर्गत रेल्वेच्या हद्दीत ज्यात रेल्वे मार्ग, बोगदे आणि जलवाहिनी पुलांचा समावेश होतो, तिथे अनधिकृत प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला: ६ महिन्यांपर्यंतचा तुरुंगवास, किंवा १,००० रुपयांपर्यंतचा दंड, किंवा दोन्ही (तुरुंगवास आणि दंड) शिक्षा होऊ शकतात. रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकांनी संपूर्ण विभागात अशा ठिकाणी गस्त वाढवली आहे.