नाशिक: द महिला आणि किशोरवयीन मुलींसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या दिशेने राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्र’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा विस्तार करण्यात येत आहे. पुणे आणि सातारा जिल्ह्यानंतर आता नाशिक जिल्ह्याचाही या अभियानात अधिकृत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात लवकरच या अभियानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविली जाणार आहे. देशात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. दर आठ मिनिटांनी एका महिलेला या आजारामुळे जीव गमवावा लागत आहे. दररोज सुमारे २०० महिलांचा मृत्यू होत आहे. हा कर्करोग देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. मात्र, वेळेवर तपासणी, योग्य उपचार आणि एचपीव्ही लसीकरणाच्या माध्यमातून हा कर्करोग पूर्णपणे टाळता येऊ शकतो.
या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे लवकर जागरूकता, वेळेवर प्रतिबंध आणि नऊ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींसाठी एचपीव्ही लसीकरण करून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचा समूळ नायनाट करणे, हा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील लाखो मुलींच्या आरोग्याचे आणि भविष्यातील सुरक्षिततेचे संरक्षण करण्यासाठी एक व्यापक प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेचे प्रारूप उभे राहत आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगमुक्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून किशोरवयीन मुलींच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचेल याची खात्रीही त्यांनी दिली आहे.
मुलींचे संरक्षण करणे हे आपले नैतिक आणि सामाजिक दायीत्व आहे. कॉर्पोरेट घटकांनी सीएसआरच्या माध्यमातून या अभियानात सहभागी व्हावे आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाविरुद्धच्या आपल्या सामूहिक लढ्याला बळ द्यावे, असे आवाहन केले आहे. शासनाबरोबर समन्वय साधून जनजागृती, प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि समुदाय पातळीवर विश्वास निर्माण करण्यासाठी जीविका फाउंडेशन कार्यरत आहे. फाऊंडेशनचे संचालक जिग्नेश पटेल यांनी , राज्य शासनासोबत या अत्यंत महत्त्वाच्या सार्वजनिक आरोग्य अभियानाचा भाग होण्याचा आम्हाला अभिमान असल्याचे म्हटले आहे. नाशिक जिल्ह्याच्या समावेशामुळे दहा प्राधान्य जिल्ह्यांमध्ये टप्प्या- टप्प्याने राबविण्यात येणाऱ्या या राज्यव्यापी अभियानाला अधिक गती मिळणार आहे.

