​नाशिक : लॅपटॉपमधील हार्ड डिस्कची चोरी करून त्यातील काही आक्षेपार्ह छायाचित्रे, चित्रफिती काढून घेत ६३ वर्षीय व्यावसायिकाला धमकावून १२ लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणात तक्रारदार असणाऱ्या कथित पत्रकाराने अनेक महिलांशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे चित्रीकरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून रवींद्र एरंडे याच्याविरुद्ध लैंगिक शोषण तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

​भोंदूबाबा अशोक खरातच्या प्रकरणात नवनवीन खुलासे होत असतानाच त्याच स्वरूपाचा दुसरा प्रकार समोर आला आहे. सातपूर येथील व्यावसायिक, कथित सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रवींद्र एरंडेची महिला सबलीकरणासाठी एक संस्था आहे. त्यांच्या कार्यालयातील लॅपटॉपमधील हार्ड डिस्क चोरीला गेल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दाखल होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना गायब असलेल्या हार्ड डिस्कमधील काही आक्षेपार्ह छायाचित्रे व चित्रफिती याआधारे अज्ञात व्यक्तीने धमकावत पैसे मागितल्याची तक्रार त्याने केली. तक्रारदाराकडे १२ लाख रुपये मागण्यात आले.

या आधीही तक्रारदाराने १० हजार रुपये खंडणी संबंधितांना दिली होती. सातपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने या प्रकरणाचा समांतर तपास सुरू करण्यात आला. या प्रकरणातील संशयित आडगावजवळील दहावा मैल परिसरात असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने पाठलाग करून संशयितांना जेरबंद केले.

​आकाश बकरे (२८, अशोक नगर), प्रकाश पानपाटील (२५, सातपूर कॉलनी), सूरज गवई (२७, मोतीवाला कॉलेजजवळ), श्रीपत शिंदे (३८, खंबाळे) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. न्यायालयाने संशयितांना ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

​संशयितांना पकडल्यानंतर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली. तक्रारदार संशयित रवींद्र एरंडे विरोधात पीडित महिलेने तक्रार दिली. पीडितेच्या मुलास सरकारी नोकरी लावून देण्याच्या नावाखाली संशयित एरंडेने ‘तुमचे भविष्य उज्ज्वल करून देतो’ असे आमिष दाखवत नाशिक व इगतपुरी परिसरातील विविध हॉटेल्समध्ये नेऊन वारंवार लैंगिक शोषण केले. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात एरंडेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित एरंडेला अटक करून चार भ्रमणध्वनी, दोन पेन ड्राइव्ह आणि एक मेमरी कार्ड पोलिसांनी हस्तगत केले.

​१२१ चित्रफिती…

​प्राथमिक तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या. संशयित रवींद्र एरंडेने विविध महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्यांच्या चित्रफिती तयार केल्याचे समोर आले आहे. २००३ ते २०२४ या कालावधीतील विविध महिला व मैत्रिणींचे अश्लील चित्रण केलेल्या १२१ चित्रफिती आढळल्या असून त्यांची पडताळणी सुरू आहे. या संपूर्ण प्रकरणात गोपनीयता बाळगत अंबड, सातपूर पोलिसांचे विशेष तपास पथक तयार करून चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी सांगितले.

​पोलिसांचे आवाहन…

​रवींद्र एरंडे याने विविध महिलांसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करीत त्यांचे व्हिडिओ चित्रण केल्याची बाब समोर आली आहे. संशयित एरंडेविरोधात पीडित महिलांनी तक्रार देण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधावा. तक्रारदाराची माहिती गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले आहे. या संदर्भात तक्रारीसाठी सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी – ९०४९८७२८२२, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे – ९८२३२३४१७६, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नाली पलांडे – ७७७४००२७१० यांच्याशी संपर्क साधावा.