नाशिक : पंचवटीतील श्री काळाराम संस्थानच्या वतीने बुधवारी दुपारी ४.४४ वाजता धर्मध्वज स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे यांची उपस्थिती राहणार आहे.

श्री काळाराम मंदिर देवस्थानाचा प्राचीन धर्मध्वज जीर्ण झाल्याने भव्य स्वरूपात धर्मध्वज उभारण्यात येणार आहे. १९६२ साली धर्मध्वज उभारण्यात आला होता. वातावरणातील बदलामुळे तो जीर्ण झाला आहे. धर्मस्तंभ (ध्वजस्तंभ) अयोध्या येथील नमुन्यावर तसेच धर्मशास्त्रावर आधारित असून सुमारे २१ फूट उंचीचा पितळी (ब्रास) स्तंभ असेल. स्थैर्य, परंपरा आणि आध्यात्मिक तेज यांचे तो प्रतीक आहे. धर्मध्वज हा भगवा (केशरी) रंगाचा असून त्याचे परिमाण अंदाजे पाच फूट बाय ११ फूट असेल; या ध्वजावर भगवान हनुमानाची प्रतिमा तसेच जय श्रीराम, ॐ आणि चिन्ह अंकित केलेले आहे. सनातन धर्माच्या शौर्य, श्रद्धा व ऊर्जा यांचे प्रतीक तर सूर्य प्रतिमा हे रघुवंशाचे प्रतीक म्हणून मंदिरावर धर्मध्वज फडकणार आहे. धर्मध्वज स्थापना ही भारतीय सनातन संस्कृतीतील परंपरा असून धर्म, सत्य, शौर्य व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी आहे; यानिमित्ताने वेदघोष, पूजन-विधी व धार्मिक अनुष्ठानांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष अक्षय कलंत्री यांनी दिली.

या सोहळ्यास देशभरातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. धर्मध्वज स्थापनेनंतर संतांचे आशीर्वचन होणार आहे. दरम्यान, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापौर हिमगौरी आडके, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंदिराला भेट देत पाहणी करुन सुरक्षेचा आढावा घेतला.

पुरातन ध्वजाची १९६२ साली स्थापना

धर्मध्वज स्थापना कार्यक्रमास सकाळी आठपासून सुरूवात होणार असून दुपारी चारपर्यंत विधीवत पूजन होईल. यासाठी प्रधान आचार्य म्हणून महंत सुधीरदास महाराज, पौराेहित्य शांताराम भानोसे, पं. दिनेश गायधनी करणार आहेत. पुरातन ध्वज १९६२ साली मंदिरात स्थापित झाला होता. वातावरणातील बदलाने सद्यस्थितीत तो जीर्ण अवस्थेत असल्याने धर्मध्वजारोहण होत आहे.