नाशिक – नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका माता देवस्थान परिसरात सुरू असलेले खोदकाम, परिसरात होणारी वाहतूक कोंडी, उत्सव काळात वाहनतळ, या विषयांवर श्री कालिका मंदिर देवस्थान विश्वस्त, वाहतूक विभाग आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या एकत्रित आढावा बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर एकत्रित पाहणी करण्यात आली.
नाशिक शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका माता मंदिर देवस्थान परिसरात नवरात्र काळात नऊ दिवस देवीचा जागर होतो. देवस्थान परिसरात दर्शनासाठी उत्सवकाळाता लाखांहून अधिक भाविकांची गर्दी होते. या अनुषंगाने देवस्थानच्या वतीने भाविकांची संख्या लक्षात सुरक्षा आढावा बैठक झाली. बैठकीस देवस्थानचे अध्यक्ष केशवराव पाटील यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित होते. महापालिकेच्या उपायुक्त सुवर्णा दखणे, वाहतूक विभागाचे सहायक उपायुक्त माधव रेड्डी तसेच मुंबई नाका पोलीस ठाण्याचे निरीक्षक उपस्थित होते.
पाटील यांनी भाविकांच्या सुरक्षेच्या दृृष्टीने पाच कोटीचा विमा काढण्यात आला असल्याचे सांगितले. मंदिर परिसराच्या आवारात फिरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सव काळात प्लास्टिकला बंदी आहे. आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी व्हिलचेअर तसेच डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे पथक कार्यरत राहणार आहे. ५०० स्वयंसेवक या काळात सेवा देणार असून त्यांच्या जेवणाची व्यवस्था देवस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे. पोलिसांनी उत्सव काळात भाविकांची होणारी गर्दी पाहता पहाटे तसेच रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी, महापालिकेने वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली. या परिसरात पावसाळी गटार योजनेसाठी झालेल्या खोदकामावर महापालिकेने तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना करावी, अशीही मागणी करण्यात आली.
दखणे यांनी देवस्थानच्या वतीने सांगण्यात आलेल्या सुचनांनुसार संबंधित विभागांना माहिती देण्याचे आश्वासन दिले. सहायक पोलीस उपायुक्त रेड्डी यांनी वाहतूक विभाग तसेच पोलिसांचे देवस्थानला सहकार्य राहील, असे सांगितले. उत्सव काळातही मुंबई नाका ते चांडक सर्कल आणि सारडा सर्कल ते मुंबई नाका या मार्गावरील वाहतूक चालु ठेवावी लागणार आहे. ही वाहतूक पंचवटी परिसराकडून वळविता येणार नाही. पंचवटी परिसरातून श्री सप्तश्रृंगी गडाकडे जाणारी २०० जादा बससेवा जाणार आहे. तसेच या वाहतुकीचा ताण इंदिरा नगर बोगद्यावर येईल. वाहतूक विस्कळीत होईल. जे रस्ते वाहतुकीसाठी सुरू राहतील त्या भागात दालने लावण्यात येऊ नयेत, अशी सूचना केली.
आढावा बैठकीनंतर देवस्थानचे विश्वस्थ तसेच पोलीस आणि महापालिका अधिकारी यांनी मंदिर देवस्थान परिसराची संयुक्त पाहणी करत आवश्यक उपाययोजना, वाहनतळ यासह वेगवेगळ्या मुद्यांवर चर्चा केली.
