नाशिक – जिल्ह्यातील नांदुरी-अभोणा मार्गावर मंगळवारी दुपारी नाशिक- कनाशी बसला अपघात झाला. यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
मंगळवारी कळवण आगाराची नाशिकहून अभोणा, कनाशीच्या दिशेने निघालेली बस दुपारी साडेबाराच्या सुमारास नांदुरी-अभोणा मार्गावरील कातळगाव फाट्याजवळ आली असता अभोण्याकडून नांदुरीकडे दुचाकी भरधाव येत असल्याचे बस चालकाला दिसले. दुचाकी बसवर आदळण्याचा अंदाज येताच चालक पाटील यांनी बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. पावसामुळे रस्त्याच्या कडा ढासळल्याने बस रस्त्याच्या एका बाजूला उतरली.
हेही वाचा – कोलकाता घटनेनंतर स्वसंरक्षणासाठी परिचारिकांना मिरची पूड पाकिटांचे वाटप
चालक पाटील आणि वाहक बागूल यांनी प्रसंगावधान दाखवत बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्याने अनर्थ टळला. या अपघातात कुणालाही हानी झाली नसून सर्व प्रवाशांना कळवण आगारातून दुसरी बस बोलवून मार्गस्थ करण्यात आले. या बसमध्ये ७५ प्रवासी असल्याचे सांगण्यात आले.
अपघातस्थळी गर्दी झाली होती. अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आली.
हेही वाचा – मालेगावातील पश्चिम भागात बंदचा परिणाम
अपघातस्थळी स्थानिक नागरिक रवींद्र भुसारे यांनी मोलाचे सहकार्य केले. अभोणा- नांदुरी रस्त्यावर चिंचबारी येथे काही ठिकाणी पावसामुळे दरड कोसळून माती, दगड साचले आहेत. तसेच अभोणा रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेली माती, दगड तत्काळ बाजूला करण्याची मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.