नाशिक –शहरातील कृषीनगर भागात रस्त्यात आडव्या टाकलेल्या लोखंडी पाईपला धडकून युवकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले. कुंभमेळा कामांतील कंत्राटदारांच्या हलगर्जीपणावर सर्वपक्षीय सदस्यांनी बोट ठेवत मनपा प्रशासन संबंधितांना पाठिशी घातल असल्याचे आरोप करण्यात आले. या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी दिले. कुंभमेळ्याच्या कामांवर देखरेख व नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.

महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली सर्वसाधारण सभा खोदकामे, खड्डे व कंत्राटदारांच्या बेफिकिरीमुळे होणारे अपघात याच कारणांनी गाजली. कृषीनगर भागात रस्त्यातील लोखंडी पाईपला धडकून सिद्धार्थ गोरे यांचा मृत्यू झाला. मयत गोरे यांची पत्नी लहानग्यांना घेऊन प्रेक्षकगृहात दाखल झाली होती. त्यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत सदस्यांनी कंत्राटदार व मनपा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. यापूर्वी महापौरांनी निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. परंतु, प्रशासनाने त्याचेही पालन केले नसल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली. मृत सिद्धार्थ गोरे यांच्या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. महापालिकेने पाच लाखांच्या मदतीबरोबर त्यांच्या पत्नीला तात्काळ मानधनावर महापालिकेत नोकरी द्यावी आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलावा, अशी मागणी करण्यात आली. ठेकेदारांच्या चुकांमुळे महापालिकेची बदनामी होत असून नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष न दिल्यामुळे हा अपघात घडल्याचा आरोप नगरसेवकांनी केला.

गंगापूर धरणतून थेट जलवाहिनीच्या कामात विलंब झाला असून ठेकेदाराला दर दिवशी अडीच लाख रुपये दंड केला जात असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली. परंतु, ठेकेदाराने मागील सहा महिन्यांपासून देयके सादर केली नसल्याने दंडात्मक रकमेची वसुली करता आली नसल्याची कबुली देण्यात आली. शिवसेना ठाकरे गटाने मृत्युमुखी पडलेल्या कुटूंबियाला एक काेटीची मदत करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. तर शिंदे सेनेचे गटनेते अजय बाेरस्ते यांनीही ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अन्यथा आम्हाला न्यायालयात दाद मागावी लागेल असा इशारा दिला. यावेळी नगरसेवकांनी आपल्या मानधनातील रक्कमही मृत गोरे यांच्या कुटुंबियांना मदत म्हणून देण्याचे मान्य केले.

महापौर-केशव पोरजे यांच्यात शाब्दीक चकमक

लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) गटनेते केशव पोरजे आणि महापौर हिमगौरी आहेर यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. खोदकामे, खड्ड्यांमुळे नागरिकांना प्राण गमवावे लागत असताना संवेदनशील विषयावर बोलू दिले जात नसल्याचा आरोप पोरजे यांनी केला. त्यावर महापौरांनी तो विषय चर्चेसाठी घेतला जाईल, असे स्पष्टीकरण दिले. मात्र पोरजे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. महापौरांनी त्यांना सभागृहाची शिस्त पाळण्याचा सल्ला दिला. शाब्दीक चकमकीमुळे इतर सदस्यांनी मध्यस्थी करीत पोरजे यांना शांत बसण्याचा आग्रह धरला.

प्रकल्प सल्लागारांना नोटीस, देखरेखीची जबाबदारी अभियंत्यांवर

तीन तासांच्या वादळी चर्चेनंतर महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी जलवाहिनीच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदार व संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. या कामांच्या प्रगतीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारांची आहे. या सल्लागार कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले जाईल. अपघातग्रस्त गोरे कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत आणि त्यांच्या पत्नीला मानधनावर सेवेत रुजू करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.

अपघातग्रस्तांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा खर्च कंत्राटदारांकडून वसूल केला जाणार आहे. महापालिकेत नव्याने दाखल झालेल्या अभियंत्यांची विविध कामांच्या ठिकाणी नियुक्ती करावी. मनपाच्या सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित रहावे. प्रशासकीय कामांसाठी त्यांनी दुपारी चार ते सहा वेळ निश्चित करावी. अपघातग्रस्तांच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च मनपा प्रशासनाने करावा, असे निर्देश महापौरांनी दिले आहेत.