नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, २८ ते ३० ऑगस्ट या कालावधीत ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्र्यंबक रस्त्यालगतच्या ठक्कर डोम येथे होणाऱ्या या महोत्सवात विविध प्रदेश, परंपरा आणि कलाप्रकार एकाच व्यासपीठावर येणार आहेत. कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या या पहिल्याच सांस्कृतिक कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
महाराष्ट्राची कीर्तन परंपरा, पंजाबची गुरबाणी शबद कीर्तन परंपरा आणि मणिपूरचे वैशिष्ट्यपूर्ण नट संकीर्तन अशा देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा संगम या महोत्सवातून साधण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी अमृताश्रम स्वामी महाराज यांच्या कीर्तनाने सुरुवात होणार असून, त्यानंतर राहुल देशपांडे यांच्या अभंगवारीचे सादरीकरण होईल. विविध भक्तिपरंपरांना एकत्र आणून त्यातील वैविध्य आणि त्यांना जोडणारा भक्तीचा समान धागा अधोरेखित करणे हा या महोत्सवाचा उद्देश असल्याचे प्राधिकरणाने म्हटले आहे.
गुरबाणीपासून मणिपूरच्या नट संकिर्तनापर्यंत
महोत्सवाच्या ३० ऑगस्टच्या अंतिम दिवशी देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरांचा विशेष अनुभव घेता येणार आहे. दुपारी श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंह हजुरी रागी यांचे गुरबाणी शबद कीर्तन होईल. सायंकाळी मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याचे सादरीकरण होईल. सायंकाळी निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
विद्यापीठ उपकेंद्राचे लोकार्पण
या दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक कॅम्प्सचे लोकार्पण दिंडोरी तालुक्यातील शिवनई येथे हा कार्यक्रम होणार आहे. तसेच मविप्र शिक्षण संस्थेच्या दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथील कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन होणार आहे.
