नाशिक – नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर परिसरात शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांची विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, सिंहस्थाचे महत्त्वाचे स्थान असलेल्या इगतपुरी तालुक्यातील श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थाकडे अद्यापही अपेक्षित लक्ष दिले जात नसल्याची नाराजी स्थानिक पदाधिकारी, संस्थानाचे विश्वस्त तसेच साधू-महंतांकडून व्यक्त होत आहे.

कपिलधारा तीर्थावर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात मोठ्या संख्येने भाविक तसेच साधू-महंत अमृत स्नानासाठी येत असतात. त्यामुळे या परिसरात पायाभूत सुविधांचा विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, तीर्थस्थळावरील गळतीची समस्या, अपुरे साधू निवास, अपुऱ्या गोशाळा तसेच इतर मूलभूत सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या कायम आहेत. शासनाच्या माध्यमातून परिसराच्या विकासासाठी निधीची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात अद्याप ठोस कामांना सुरुवात झालेली नसल्याची माहिती विश्वस्तांकडून देण्यात आली. सिंहस्थाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या कामांसाठी भरीव निधीची आवश्यकता असताना तुटपुंजा निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याने विकासकामांना अपेक्षित गती मिळत नसल्याचे सांगण्यात येते.

याबाबत श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थाचे विश्वस्त कुलदीपभाऊ चौधरी यांनी सांगितले की, “कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक स्नानासाठी कपिलधारा तीर्थावर येतात. साधू-महंतांच्या दृष्टीनेही या तीर्थाला विशेष महत्त्व आहे. असे असताना या ठिकाणच्या विकासाकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. स्थानिक पदाधिकारी, संस्थानाचे विश्वस्त आणि साधू-महंत यांना विश्वासात घेऊन विकासकामांचे नियोजन होणे आवश्यक आहे.”

दरम्यान, कपिलधारा तीर्थाचे महंत फलहरी महाराज यांनीही तीर्थक्षेत्राच्या विकासाबाबत चिंता व्यक्त केली. “सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात येथे मोठ्या संख्येने भाविक आणि संत येणार आहेत. त्यांची गैरसोय होऊ नयेत, यासाठी आवश्यक असलेली कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली पाहिजेत. त्यासाठी शासनाने भरीव निधी उपलब्ध करून देऊन तातडीने विकासकामांना सुरुवात करावी,” अशी मागणी त्यांनी केली.

सिंहस्थ कुंभमेळ्याला आता फारसा कालावधी शिल्लक नसताना कपिलधारा तीर्थाच्या विकासकामांना गती देण्याची गरज आहे. शासनाने स्थानिक पदाधिकारी, विश्वस्त आणि साधू-महंत यांच्याशी समन्वय साधून आवश्यक कामांचे प्राधान्यक्रम निश्चित करावेत, अशी मागणी भाविकांकडूनही होत आहे.