नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, परिवहन पायाभूत सुविधा, बस संचलन, मनुष्यबळ नियोजन तसेच तंत्रज्ञानाच्या वापरावर विचार विनिमय केला जात आहे. कुंभकाळात भाविकांच्या वाहतुकीसाठी साडेचार हजार बसेसचे नियोजन केले जाणार आहे. त्र्यंबकेश्वर, जव्हार फाटा, निमाणी, वणी, नाशिक महामार्ग आदी प्रमुख स्थानकांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. मागील कुंभमेळ्याचा अनुभव असणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनावर नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे.
कुंभमेळ्यात भाविकांच्या सुलभ व सुरक्षित वाहतुकीसाठी करण्यात येणाऱ्या परिवहन नियोजनाचा आढावा नाशिक–त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने बैठकीत घेण्यात आला. प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक (वाहतूक) नितीन मेंद, महाव्यवस्थापक दिनेश महाजन, उपमहाव्यवस्थापक चेतन हसबनीस आदी उपस्थित होते.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७ अंतर्गत प्रस्तावित पायाभूत कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. त्र्यंबकेश्वर, जव्हार फाटा, निमाणी, वणी, नाशिक महामार्ग आदी प्रमुख ठिकाणांवरील एसटी बस स्थानकांच्या नूतनीकरण व काँक्रिटीकरणाबाबत चर्चा करण्यात आली. या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच कार्यादेश देण्यात येणार आहेत. सप्तशृंगी गड येथे भूसंपादन प्रक्रियेमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी अटींसह निविदा काढण्याच्या शक्यतेवर चर्चा करण्यात आली.
कुंभमेळा काळात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये कोट्यवधी भाविक येण्याचा अंदाज आहे. रेल्वे, रस्ते मार्गाने येणाऱ्या भाविकांना शहरात येण्यासाठी बसेसची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी सुमारे ४,५०० बसेस ठेवण्याचे नियोजन असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. या बसेस अंतर्गत व बाह्य वाहनतळ तसेच कसबे सुकेणे, ओढा, खेरवाडी, नाशिकरोड, देवळाली कॅम्प, इगतपुरी रेल्वे स्थानक आदी प्रमुख ठिकाणांवरून त्र्यंबकेश्वर आणि अंतर्गत वाहनतळापर्यंत भाविकांची वाहतूक करतील. बस तैनाती, मार्ग नियोजन व सामग्री पुरवठा व्यवस्थापन याबाबतचे सूक्ष्म नियोजन एसटी महामंडळाच्या केंद्रीय स्तरावर करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले.
एसटी महामंडळाचे यांत्रिक व प्रशासकीय पर्यवेक्षण अधिकारी कुंभमेळ्याच्या सहा महिने आधी, जानेवारी २०२७ पासून नाशिक येथे नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थानिक भौगोलिक परिस्थिती व कार्यपद्धतीची ओळख करून देण्यासाठी प्रशिक्षण व भूमिका निश्चिती आधीच करण्यात येईल. बदली झाल्यावरही नियुक्तीची सातत्यता राखण्यात येणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक विभागात स्वतंत्र कुंभमेळा कक्ष स्थापन करून प्रशासकीय सूचनांची अंमलबजावणी आणि विभागीय आराखडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मागील कुंभमेळ्यांचा अनुभव लक्षात घेऊन पूर्वी कुंभमेळ्यात कार्य केलेल्या निवृत्त राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना मानधन अथवा करार पद्धतीने नियमानुसार सहभागी करून घेण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. कुंभमेळा कालावधीत वाहतूक नियोजन अधिक प्रभावी करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व सिम्युलेशन तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रवासी मागणी विश्लेषण व मार्ग नकाशा तयार करण्याच्या शक्यतांचा अभ्यास करण्याचे निश्चित करण्यात आले.

