नाशिक – कुंभमेळ्यातील विविध कामे आणि वृक्षतोड हे विषय सात महिन्यांपासून गाजत आहेत. हरित लवादाने १९ जूनपर्यंत वृक्षतोडीवर स्थगिती कायम ठेवत वृक्ष प्राधिकरण समितीच्या अधिकारावर नियंत्रण आणले. आपत्कालीन स्थितीत वृक्ष तोडणे अगदीच गरजेचे असेल, तेव्हा हरित लवादाकडे परवानगी मागण्याचे निर्देश आहेत. वृक्षप्रेमी आणि महापालिका यांच्यातील लढाईमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर तोडगा काढण्यासाठी पुणे रिंग रोडच्या धर्तीवर नाशिकमध्ये वृक्ष पुनर्रोपणाचे प्रारुप राबविण्याचे निश्चित करण्यात आले. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तब्बल ३५ हजार कोटींची कामे हाती घेण्यात आली आहेत. रस्ते, पूल, घाट बांधणीसह अनेक कामांसाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा विषय वादात सापडला आहे. शहरात नियम धाब्यावर बसवत महापालिका बेसुमार वृक्षतोड करीत असल्याचा आरोप वृक्षप्रेमींकडून सातत्याने होत आहे. दुसरीकडे आवश्यक ती प्रक्रिया पार पाडून वृक्षतोड केली जात असल्याचा दावा करीत या बदल्यात हजारो वृक्षांची लागवड करण्याचे सुतोवाच महापालिकेकडून करण्यात आले आहे. वृक्षतोडीच्या मुद्यावरून पर्यावरणप्रेमी आणि कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगला. वृक्षतोडीला स्थगिती दिल्यानंतरही वृक्षतोड झाल्याच्या मुद्यावर हरित लवादाने मनपा आयुक्त, उद्यान विभाग प्रमुखांसह संबंधितांना आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले आहेत. वृक्षतोडीवरील स्थगितीमुळे कुंभमेळ्यातील कामांवर विपरित परिणाम होण्याची साशंकता प्रशासकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते.
महापालिकेने उन्नत नाशिक अभियानांतर्गत शहर अधिक हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी पुढाकार घेतला. कुंभमेळा मंत्री महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पुणे रिंग रोडच्या धर्तीवर नाशिकमध्येही वृक्ष पुनर्रोपणाचे प्रारुप राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. विकास कामांमुळे झाडे तोडण्याऐवजी त्यांना नव्या ठिकाणी ‘नवजीवन’ देण्याचा पर्यावरणपूरक दृष्टिकोन असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. बैठकीस महापौर हिमगौरी आडके, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप यांच्यासह आर. एम. धारिवाल फाउंडेशनच्या अध्यक्षा जानवी धारिवाल-बालन आणि उद्योजक पुनित बालन उपस्थित होते.
आतापर्यंत १५ हजार झाडांची लागवड
शहरात आतापर्यंत १५ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यापुढे केवळ नवीन झाडे लावणेच नव्हे, तर आधीपासून असलेल्या झाडांचेही जतन आणि पुनर्रोपण करण्यावर भर दिला जाणार आहे. या उपक्रमात कोणकोणत्या प्रजातींची झाडे सुरक्षितपणे काढून पुन्हा लावता येतील, याचा सखोल अभ्यास केला जाणार असून लवकरच धारिवाल फाउंडेशनबरोबर करार करण्यात येणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी जास्तीत जास्त झाडांचे पुनर्रोपण होईल याची काळजी घ्यावी आणि या कामात सामाजिक संस्थांचा सहभागही महत्त्वाचा ठरेल, असे सूचित केले.
संवेदनशील चळवळ
वृक्षांचे पुनर्रोपण करताना प्रत्येक झाडाकडे एखाद्या रुग्णाप्रमाणे पाहिले पाहिजे. जशी आपण रुग्णाची काळजी घेतो, तशीच या झाडांची देखील काळजी घ्यावी, असे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराचा विकास होत असताना, या उपक्रमामुळे निसर्गाचाही सन्मान राखला जाणार आहे. ही केवळ झाडे हलवण्याची प्रक्रिया नाही, तर जीवन वाचविण्याची एक संवेदनशील चळवळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
