नाशिक – पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक पुरोहित संघाने मांडलेली भव्य ध्वजस्तंभ उभारणीची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे. प्रस्तावित ध्वजस्तंभ सुमारे ५१ फूट उंच असणार असून, त्याची रचना अत्यंत आकर्षक व धार्मिक प्रतीकांनी समृद्ध अशी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण स्तंभाच्या संकल्पनेत ‘अमृत मंथन’ कथेचा आधार घेतला गेला आहे.
गोदावरी काठावर होणारा सिंहस्थ कुंभमेळा भव्य-दिव्य करण्यासाठी सत्ताधारी महायुती सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या निमित्ताने तब्बल ३५ हजार कोटींची कामे केली जाणार आहेत. नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ध्वजस्तंभ व पताकांच्या नियोजन, स्थापत्य रचना, साहित्य निवड, उंचीचे निकष, धार्मिक व सांस्कृतिक प्रतीकात्मकता यावर मध्यंतरी चर्चा झाली.
ध्वजस्तंभ हे केवळ भौतिक संरचना नसून श्रद्धा, सांस्कृतिक वारसा व सामाजिक एकतेचे प्रतीक असल्याने, त्यांची रचना व उभारणी अत्यंत संवेदनशीलतेने व जबाबदारीने करण्यावर विचारविनिमय झाला आहे. ध्वजस्तंभांची उंची ५१ फूट असणार असून, त्यांची पायाभरणी अनुक्रमे १ फूट व ८ इंच त्रिज्येची असेल. ध्वजस्तंभाविषयी मांडलेल्या संकल्पनेला कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे पुरोहित संघाने म्हटले आहे. या ध्वजस्तंभाचे शिलान्यास पूजन लवकरच होणार आहे.
सिंहस्थाच्या आध्यात्मिक वैभवात भर घालणारा हा उपक्रम ठरणार आहे. यामधून धर्म, संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या ध्वजस्तंभावर विविध प्रतीकात्मक शिल्पे आणि चिन्हांचा समावेश असणार आहे. यात प्रामुख्याने अश्व, हत्ती, रत्न, कल्पवृक्ष, अप्सरा, तसेच देवी-देवतांची प्रतीकात्मक शिल्पे कोरली जाणार आहेत. याशिवाय स्तंभावर गणपती आणि कमळ यांसारखी शुभचिन्हे देखील असतील. या सर्व घटकांमधून अमृत मंथनातील विविध पैलू आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे.
कलाकुसर, धार्मिक चिन्ह…
स्तंभाच्या तळभागाची रचना कमळाच्या आकारात करण्यात येणार असून, मध्यभागात कोरीव कलाकुसर असलेले पट्टे आणि विविध धार्मिक चिन्हांनी सजवलेले भाग असतील. शीर्षस्थानी ध्वजासह देवतांची प्रतिमा स्थापित केली जाणार आहे, ज्यामुळे संपूर्ण स्तंभ अधिक भव्य आणि दैदिप्यमान दिसेल. सध्या अस्तित्वात असलेला जुना ध्वजस्तंभ काढून त्या जागी नवीन ध्वजस्तंभ बसविण्यात येणार असल्याची माहिती पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी दिली. नवीन ध्वजस्तंभ अधिक मजबूत, सुरक्षित आणि आकर्षक स्वरूपात उभारला जाणार आहे. रामकुंड परिसरात उभारण्यात येणारा हा ध्वजस्तंभ भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, तसेच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या परंपरेला अधिक बळकटी देईल, असा विश्वास पुरोहित संघाने व्यक्त केला.
