नाशिक : केंद्रात, राज्यात आणि अगदी महानगरपालिकेतही तुमची सत्ता आहे. मग भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या वतीने काढलेला मोर्चा नेमका कोणाविरुद्ध होता, असा प्रश्न उपस्थित करीत सत्ताधाऱ्यांचे लक्ष जनतेच्या प्रश्नांपेक्षा राजकारणावर अधिक असल्याची टीका शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहण सोहळा आणि हेलिपॅडवर २० कोटी रुपयांहून अधिक खर्च होत असताना शेतकऱ्यांना मात्र मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मनेगाव येथे भेट देऊन शेतकरी दत्तात्रय घोडेकर यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रलंबित नुकसानभरपाई आणि मदतीविषयी माहिती घेतली. राज्यातील २६५ हून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. एल निनोचे संकट गंभीर असून त्याचे परिणाम केवळ एका हंगामापुरते मर्यादित राहणार नाहीत. पुढील एक ते दोन वर्षे त्याचा शेतीवर परिणाम होऊ शकतो. यासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि तज्ज्ञांची मते जाणून घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली. केवळ मदतीच्या घोषणा करून सोडून देणे योग्य नाही, असा टोला ठाकरे यांनी सरकारला लगावला.

शेतकरी हा गुन्हेगार नाही. त्याला केवळ कर्जमाफी देण्याऐवजी कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा, असे ठाकरे यांनी सांगितले. दुष्काळी तालुक्यांतील विद्यार्थ्यांची शुल्कमाफी सर्वत्र झालेली नाही. कुठे ५०० ते ६०० रुपये शुल्क असले, तरी ते भरणे शेतकऱ्यांना कठीण झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

ध्वजारोहणावर कोट्यवधींचा खर्च

सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहण सोहळा आणि हेलिपॅडवर २० कोटी रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे टीकास्त्र आमदार आदित्य ठाकरे यांनी सोडले. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वारंवार घोषणा करते; मात्र प्रत्यक्षात त्यांना कोणतीही मदत मिळत नाही, असा आरोप त्यांनी केला. सिंहस्थ कुंभमेळ्यातील ध्वजारोहणाच्या सोहळ्यावर आणि हेलिपॅडवर किती खर्च झाला? मग शेतकऱ्यांसाठी मदत का नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गेल्या वर्षी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ३२ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजमधील मदत अद्याप पूर्णपणे मिळालेली नाही. दिवाळीपूर्वी जाहीर केलेले पाच हजार रुपयेही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे केवळ आश्वासने न देता शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.