नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील प्राचीन मंदिरे, घाट आणि कुंडांच्या पुनरुज्जीवनाची कामे एकाचवेळी सुरू असल्याने महाराष्ट्रात बेसॉल्ट दगडाची टंचाई जाणवू लागली आहे. या दगडाची मागणी वाढल्याने दरही उंचावले आहेत. नेवासा येथील खाणी बंद असल्याने हा दगड नांदेडच्या देगलूरहून आणावा लागत आहे. काहींनी थेट राजस्थानातील मोठ्या आकाराच्या बेसॉल्ट दगडाला पसंती दिली आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश प्राचीन मंदिरे अतिशय मजबूत आणि टिकाऊ असणाऱ्या बेसॉल्ट दगडात बांधलेली आहेत. कुंभमेळ्यानिमित्त राज्य पुरातत्व विभाग नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील १६ प्राचीन मंदिरे व घाटांचा कायाकल्प करीत आहे. सुमारे ५६ कोटी रुपये खर्चाच्या या कामांमध्ये मुख्य घटक असलेल्या बेसॉल्ट दगडांचा तुटवडा भासत आहे.
भीमाशंकर मंदिराचे काम करणारे सवाणी हेरिटेज सध्या तुळजापूर व पंढरपूर मंदिरांसोबत नाशिकमधील नारोशंकर मंदिर आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थाचेही काम करीत आहे. या कंपनीचे संचालक राम सवानी यांनी सरकारने विविध मंदिरांचा जीर्णोद्धार आणि घाट विकासाचे प्रकल्प हाती घेतल्यामुळे बेसॉल्ट दगडाच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्याचे नमूद केले. या कामांसाठी ते राजस्थानमधून दगड मागवतात. महाराष्ट्रात लहान आकाराचे दगड मिळतात. राजस्थानमधील बेसॉल्ट दगड त्यापेक्षा मजबूत, भरीव आणि खांबाच्या स्वरूपात असतो. मोठ्या रचनांसाठी (उदा. १४ फूट स्तंभ) राजस्थानहून दगड आणणे आवश्यक ठरते, असे त्यांचे म्हणणे आहे.
नेवासा येथील खाणीतून पूर्वी बेसॉल्ट दगड उपलब्ध होत असे. दोन वर्षांपासून तेथील खाणी बंद आहेत. स्थानिक पातळीवर कठीण बेसॉल्ट उपलब्ध नसल्याने नांदेडच्या देगलूरचा दगड अधिक वाहतूक खर्च करून येथे आणावा लागतो, असे मंदिर जीर्णोद्धाराचे काम करणारे अक्षय गुत्ते यांनी सांगितले. देगलूरचा दगड अत्यंत कडक बेसॉल्ट असून त्यावर घडाई करण्यासही वेळ लागतो. या कामात हवामानाचेही आव्हान आहे. सिमेंटचे काम सहा तासांत स्थिर होते. दगडी बांधकामातील चुना स्थिर होण्यासाठी किमान ४८ तास लागतात. त्र्यंबकेश्वरच्या वातावरणात एका थरानंतर दुसऱ्या थराचे काम करण्यासाठी वाट पाहावी लागते, असेही गुत्ते यांनी नमूद केले.
दर किती?
देगलूरचा नैसर्गिक, म्हणजेच अनघड दगड एक बाय दीड फूट, दीड बाय दोन फूट आकारात मिळतो. एक बाय दीड फूट आकाराच्या दगडाचे वजन सुमारे १०० किलो असते. मागणी वाढल्याने त्याचे दरही वाढले आहेत. सध्या साधारण १३० ते १४० रुपये प्रतिनग या दराने हे दगड मिळतात. तर राजस्थानातील बेसॉल्ट दगड चौकोनी आणि कापलेल्या स्वरूपात मिळतो, जो बसविण्यास सोपा असतो. राजस्थानमधून तो आणण्यासाठी एका मालमोटारीचा वाहतूक खर्च सव्वा लाख रुपये आहे. राजस्थानच्या बेसॉल्ट दगडाचे दर आकार आणि कोरीव कामावर अवलंबून असतात. साधारणतः १०० ते २०० रुपये रनिंग फूट दराने तो मिळतो. भीमाशंकर मंदिराच्या कामावेळी मालासह एका मालमोटारीला साडेतीन लाख रुपये खर्च आल्याचे सांगितले जाते.
१६ मंदिरे व कुंडांचा जीर्णोद्धार, दुरुस्ती
नाशिक-त्र्यंबकेश्वर भागातील १६ मंदिरे व कुंडांच्या जीर्णोद्धाराचे आणि दुरुस्तीचे काम प्रगतिपथावर आहे. नारोशंकर मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील प्रयागतीर्थ, बिल्वतीर्थ, इंद्रकुंड आणि मुकुंद या ठिकाणच्या कामांसाठीही बेसॉल्ट दगडांची आवश्यकता आहे. अचानक वाढलेली मागणी आणि पुरवठादारांची कमतरता यामुळे हा दगड वेळेवर उपलब्ध होत नाही. पावसाळ्यात खाणींमध्ये पाणी साचल्यामुळे दगड काढण्यात अडचणी येत असल्याचे ठेकेदारांकडून सांगितले जाते, अशी माहिती राज्य पुरातत्व नाशिक विभागाचे उपसंचालक अमोल गोटे यांनी दिली.
