नाशिक – यंदाचा कुंभमेळा हा प्रयागराजच्या तुलनेत आव्हानात्मक आहे. भाविकांना सर्वोत्तम सेवा मिळाव्या यासाठी शासन कटिबध्द असून माध्यमे तसेच नेत्यांनी कोणत्या ठेकेदाराला काम दिले, याकडे लक्ष देऊ नये. सर्व कामे पारदर्शक पध्दतीने होतील, काही चुकले तर साधू- महंतांनी सांभाळून घ्यावे, चुका दुरूस्त केल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
गूरूवारी कुंभमेळ्याच्या सुमारे सहा हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, क्रीडामंत्री ॲड. माणिक कोकाटे, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दादा भुसे आदींच्या उपस्थित आभासी पध्दतीने करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामकाल पथ प्रकल्पाची माहिती जाणून घेतली. गतवेळच्या तुलनेत पाच पट अधिक गर्दी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात होणार आहे. हे आव्हान आपल्याला पेलायचे आहे. भाविकांची जबाबदारी आपल्यावर आहे. केंद्र आणि राज्य सरकारने मिळून नाशिकमध्ये जवळपास २० हजार कोटींपेक्षा जास्त कामे मंजूर केली आहेत. त्यातील काही कामांचे आज भूमीपूजन झाले. नाशिक-त्र्यंबकेश्वरची ओळख बदलेल असे काम होणार आहे. या सगळ्या कामात पारदर्शकता असेल. पण यामध्ये अन्य लोकांनी पडू नये, असेही त्यांनी सूचित केले.
मंत्री महाजन यांनी कुंभमेळ्यासाठी दोन वर्षापासून काम सुरू असून सहा मंत्र्यांची उप समिती तसेच प्रशासकीय अधिकारी रात्रीचा दिवस करीत काम करत असल्याचे सांगितले. कुंभमेळा केवळ धार्मिक कार्य नसून त्या पलीकडे रोजगार, पर्यटन वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार असून शहराला जागतिक नकाशावर ओळख प्राप्त होईल असा विश्वास व्यक्त केला. लाखो लोक या ठिकाणी येणार आहेत. त्यांची सुरक्षा, नियोजन उत्तम असले पाहिजे. कुंभ पर्वात नदी स्वच्छता, रस्ते आदी कामांवर लक्ष देण्यात येत आहे. हा सोहळा आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
काही चुकले तर सांभाळून घ्यावे…
नाशिकमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यामतून २० हजार कोटींपेक्षा अधिकची कामे सुरू करण्यात येत आहेत. कुंभमेळ्यापर्यंत ही रक्कम २५ हजार कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभ्या राहतील. काही चुकले तर साधू महंतांनी सांभाळून घ्यावे. चुका दुरूस्त केल्या जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
