नाशिक – राज्य शासनाने कुंभमेळ्याशी संबंधित कामांना प्राधान्यक्रम दिलेला आहे. सिंहस्थाच्या दृष्टीने ही कामे वेळेत पूर्ण करायचे आहे. पाणी टंचाईचे संकट सर्वांसमोर असून या संदर्भात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले जाईल. परंतु, रस्त्यांसह सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणचे आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, हाती घेण्यात आलेल्या सिमेंट कॉक्रिटच्या रस्ते प्रकल्पांसाठी ऐन दुष्काळात मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होणार आहे. नाशिक महापालिकेने शहरातील २८ रस्त्यांची कामे हाती घेतली असून त्यातील बहुतांश सिमेंट कॉक्रिटचे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग ३० किलोमीटरचा नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ ६६ किलोमीटरचा नाशिक रिंग रोड अर्थात परिक्रमा मार्ग हे रस्तेही सिमेंट कॉक्रिटचे आहेत. इतकेच नव्हे तर, गोदावरी काठावर नव्याने कॉक्रिटचे घाट बांधले जात आहेत. दुष्काळामुळे सर्वत्र पाण्याचा काटकसरीने वापर केला जात असताना कुंभमेळ्यातील कॉक्रिटीकरण कामांवर याचा काही परिणाम होईल का, यावर कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी भाष्य केले.
कुंभची कामे वेळेत पूर्ण करण्यास प्राधान्य
इतरत्र रस्त्याच्या कामात मागे-पुढे होऊ शकते. परंतु, कुंभची कामे वेळेत पूर्ण करावयाची आहेत. पावसाने ओढ दिल्याने सगळीकडे पाणी टंचाईचे संकट आहे. या विषयात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे शेखर सिंह यांनी सांगितले. सिंहस्थाच्या तयारीत या कामांना सरकारने आधीच प्राधान्य दिलेले आहे. विहित कालमर्यादेत ही कामे पूर्ण करण्याचा प्राधिकरणचा मानस आहे.
धरणसाठ्याचाही आढावा घेणार
कुंभमेळ्यासाठी धरणातील पाणीसाठा आरक्षित करण्याच्या विषयावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने नियोजन केले जाईल. कुंभ काळातील पिण्याच्या पाण्याच्या विषयावर यापूर्वी एकदा आढावा घेण्यात आला होता. एल निनोचा प्रभाव कधीपर्यंत राहील, याचा विचार केला जाईल. जलसाठ्याचा सविस्तर आढावा घेऊन नियोजन केले जाईल. धार्मिक विधी व अन्य बाबींचा विचार करून आराखडा तयार केला जाणार आहे. पाणी वापराच्या दृष्टीने योग्य तो तोडगा काढला जाईल, असे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. दरम्यान, २०१५ मधील कुंभमेळ्यात नाशिकसह राज्यात दुष्काळाचे सावट होते. २०२७ मधील कुंभमेळ्यात अल निनोच्या संकटामुळे काय परिस्थिती राहील, याकडे सर्वांचे लक्ष आहे. यंत्रणांनाही त्याचा विचार करून तयारी करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
