नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शुभारंभप्रसंगी नाशिक महापालिकेतील नगरसेवक आणि नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. ध्वजारोहण सोहळ्यात १२२ नगरसेवकांना रामकुंडावर चांगली जागा मिळावी, असा सर्वांचा आग्रह होता. परंतु, प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यांना अतिशय दूरवरील जागा मिळाली. यामुळे सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही नाराज झाले. काहींनी थेट या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी मध्यस्थी केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधत नगरसेवकांना गांधी स्मारक येथे प्रवेश देण्यात आला. काहींना पायऱ्यांवर बसून, तर काहींना उभे राहून ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी व्हावे लागले.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सुरुवातीलाच मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळाले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात नाशिक महानगरपालिकेची महत्त्वाची भूमिका आहे. परंतु, कुंभमेळ्याची कामे करताना सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाने आम्हाला विचारात घेतले नाही, अशी तक्रार नगरसेवकांकडून नेहमीच केली जाते. कुंभमेळ्याच्या कामांसाठी झालेल्या खोदकामामुळे अनेक वाहनधारकांना प्राण गमवावे लागले, तर कित्येक जण जखमी झाले. खड्डेमय नाशिकमुळे नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत असताना कुंभमेळा प्राधिकरण मात्र नामानिराळे राहिल्याची अनेकांची खदखद आहे. कुंभमेळ्याच्या कामांची माहिती देण्यासाठी यापूर्वी आयोजित केलेल्या एका बैठकीला कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह वेळेवर उपस्थित न राहिल्याने अनेक नगरसेवकांनी बहिष्कार टाकून बैठकीतून निघून जाणे पसंत केले होते. उभयतांमधील या वादाची पुनरावृत्ती ध्वजारोहण सोहळ्यात झाल्याचे पाहायला मिळाले.

काय घडले…

कुंभमेळा प्राधिकरणाने नाशिक महापालिकेतील नगरसेवकांना दिलेल्या प्रवेशिका रामकुंडावरील मुख्य स्थळापासून दूर होत्या. तिथून काही नीटसे दिसतही नव्हते. यामुळे सत्ताधारी भाजपचे नगरसेवकही संतापले. पूर्वसूचना देऊनही नगरसेवकांची व्यवस्था दूरवर करण्यात आली. काहींकडे ओळखपत्र नसल्याने त्यांची अडवणूक झाली. इतक्या दूरवरून कार्यक्रमाला उपस्थित राहायचे असेल, तर आम्ही निघून जातो, असा इशारा काही नगरसेवकांनी दिला. हे लक्षात आल्यावर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सर्वांशी चर्चा केली. प्राधिकरणाला सांगूनही दूरवर जागा का देण्यात आली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी नगरसेवकांचे कान टोचले.

गांधी स्मारकाजवळ व्यवस्था, पण…

महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून रामकुंडावरील गांधी स्मारकालगत अतिविशिष्ट व्यक्तींसाठी असलेल्या ‘गौतमी’ आसन व्यवस्थेत नगरसेवकांना प्रवेश मिळवून दिला. परंतु, तिथेही काहींची अडवणूक झाली. काही नगरसेवकांकडे महापालिकेचे ओळखपत्र नव्हते. यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका स्वाती भामरे आणि पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून संबंधितांना प्रवेश मिळवून दिला. गांधी तलाव येथे नगरसेवकांसाठी वाढीव खुर्च्या टाकण्यात आल्या. परंतु, त्या अपुऱ्या होत्या. काही महिला नगरसेविकांनी गांधी स्मारकाच्या पायरीवर बसणे पसंत केले, तर काहींना पूर्णवेळ उभे राहावे लागले. उर्वरित आसन व्यवस्थेच्या ठिकाणी सर्वत्र कडक ऊन होते. आम्हाला मिळालेली जागा सावलीत होती, असे नंतर काही नगरसेवकांनी सांगितले.

कुंभमेळ्यात सर्व नाशिककर यजमान

कुंभमेळ्याची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली आहे. या कुंभमेळ्यात प्रथमच सर्व आखाडे एकत्र आले आहेत. नरेंद्राचार्य महाराज यांचे अनुयायी मोठ्या संख्येने आले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी बाहेरून येणाऱ्या सर्वांची व्यवस्था पाहणे हे कर्तव्य आहे. एकवेळ आपल्याला बसायला जागा मिळाली नाही तरी चालेल, पण बाहेरून आलेल्यांना बसायला जागा मिळाली पाहिजे, ही सर्व नाशिककरांची जबाबदारी आहे. सर्वांनी जबाबदारीने काम करणे आणि वागणे पुढील काळात अपेक्षित आहे.- सुनील केदार (अध्यक्ष, भाजप नाशिक महानगर जिल्हा)