नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, हजारो कोटी रुपयांची कामे प्रगतीपथावर आहेत. काही सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. या परिस्थितीत काही घटकांकडून फसवणुकीच्या उद्देशाने गैरप्रकार घडू लागले आहेत. कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावाने सीसीटीव्ही सर्वेक्षण प्रणाली आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत सुरक्षा व देखरेख व्यवस्था पुरविण्याबाबतचे बनावट कार्यादेश व परवानगीपत्र फसवणुकीच्या उद्देशाने तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दोन्ही पत्रात ३५ कोटींची रक्कम नमूद असून या कागदपत्रांवर प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या बनावट डिजिटल स्वाक्षरीचा वापर करण्यात आला आहे.

या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयातील स्वीय सहायक विजय सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निळकंठ शेवाळे नामक व्यक्ती कुंभमेळ्यानिमित्त सीसीटीव्ही सर्वेक्षण प्रणाली बसविणे, कार्यान्वित करणे व देखरेख करणे या कार्यादेशाची प्रत आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारीत सुरक्षा व देखरेख व्यवस्था पुरविण्याबाबतचा कार्यादेश व परवानगीपत्राची सत्यता पडताळणीसाठी कार्यालयात आली होती.

ही कागदपत्रे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नांदेड येथील गजानन पाटील यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांनी शेवाळे यांच्याकडील दोन आदेशाच्या प्रती व त्यांच्याच भ्रमणध्वनीतील पीडीएफ फाईल पाहिल्यानंतर दोन्ही कागदपत्रातील मजकूर, पत्राच्या टायपिंगमधील फरक, प्रकल्पाची मंजूर रक्कम आणि विभागीय आयुक्तांच्या डिजिटल स्वाक्षरीत विसंगती असल्याचा संशय आला. त्यामुळे ही कागदपत्रे प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना दाखविण्यात आली.

पडताळणीनंतर ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. विभागीय आयुक्त गेडाम यांच्या बनावट डिजिटल स्वाक्षरीच्या दोन बनावट कार्यादेशाची कागदपत्रे फसवणूक उद्देशाने तयार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. या तक्रारीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट डिजिटल स्वाक्षरी

कागदपत्रांच्या पडताळीत अभिषेक झरे (संचालक व संस्थापक) इनोव्हेटिव्ह इंटलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्यूशन्स एजन्सी, ठाणे यांच्या नावे कार्यादेशात पत्राच्या खाली ‘डॉ. प्रवीण गेडाम, अध्यक्ष नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण तथा विभागीय आयुक्त आणि वरती डिजिटल स्वाक्षरी’ असल्याचा आभास निर्माण करण्यात आल्याचे समोर आले. ही डिजिटल स्वाक्षरी आपण केली नसल्याचे गेडाम यांनी स्पष्ट केले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

स्पेलिंगमध्ये फरक

विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नेहमीच्या डिजिटल स्वाक्षरीतील स्पेलिंग आणि या कागदपत्रांवरील डिजिटल स्वाक्षरीतील स्पेलिंगमध्ये फरक आहे. कागदपत्रांवरील डिजिटल स्वाक्षरी त्यांच्या वापरातील अधिकृत डिजिटल स्वाक्षरी नसल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले.

दोन्ही पत्रात ३५ कोटींचा उल्लेख

कुंभमेळा प्राधिकरणाच्या नामपत्रातील दुसरे पत्र २० जानेवारी २०२६ रोजी अभिषेक झरे संचालक, संस्थापक इनोव्हेटिव्ह इंटलिजन्स एआय ऑटोमेशन सोल्यूशन्स एजन्सी, ठाणे यांच्या नावाने दिलेले असल्याचे दर्शविण्यात आले. त्यातही डिजिटल स्वाक्षरी असल्याचा आभास करण्यात आला. गेडाम यांच्या डिजिटल स्वाक्षरीतही फरक आहे. दोन्ही पत्रात ३५ कोटींची रक्कम नमूद आहे. या दोन्ही पत्राच्या प्रतींची पडताळणी केल्यावर त्या बनावट असल्याचे गेडाम यांनी सांगितल्याचे तक्रारीत म्हटले आहे.