नाशिक – शहरात ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी गोदावरीचे शुष्क पात्र प्रवाही दिसणार आहे. दुष्काळी परिस्थितीत कुंभमेळ्यासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडले जाणार नाही, असे पालकमंत्री तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. परंतु  एकलहरे औष्णिक वीज प्रकल्प आणि पाच गावांसाठी दरवर्षीप्रमाणे आवर्तन सोडण्याच्या निमित्ताने गोदावरी खळाळत आहे. त्यामुळे वीज प्रकल्पाची मागणी आणि ध्वजारोहण सोहळा हा योगायोग जुळवून आणण्यात आला आहे.

नाशिक येथील रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ येथे शनिवारी दुपारी १२ वाजून दोन मिनिटांनी ध्वजारोहण सोहळा होत आहे. नाशिकमधील ध्वजारोहण सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार उपस्थित असतील. तर त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्री, आखाड्यांचे महंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडेल, असे कुंभमेळामंत्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रामकुंड परिसरात अनेक कामे प्रगतीपथावर असल्याने गोदापात्र कोरडे ठेवण्यात आले आहे. ध्वजारोहणप्रसंगी शुष्क पात्रात पाणी सोडावे, अशी पुरोहित संघ आणि साधू-महंतांची मागणी आहे. ध्वजारोहण सोहळ्यासाठी धरणातून पाणी सोडण्याची शक्यता मंत्री महाजन यांनी फेटाळली. कुंभमेळ्यासाठी म्हणून खास पाणी सोडले जाणार नाही. पाण्याचा कुठेही अपव्यय होणार नाही. परंतु, एकलहरे औष्णिक वीज प्रकल्प आणि खालील पाच गावांच्या मागणीनुसार नेहमीप्रमाणे आवर्तन सोडले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

पाटबंधारे विभागाची तत्परता…

राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री महाजन यांनी याची स्पष्टता केल्यानंतर अवघ्या काही तासात पाटबंधारे विभाग सक्रिय झाला. रात्री १२.३० वाजता गंगापूर धरणातून ३०० क्युसेकने विसर्ग करण्यात आला. हे पाणी एकलहरे विद्युत प्रकल्पासाठी सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे. नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तत्काळ हलवण्यात यावे तसेच नागरीकाना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र पाणी आरक्षण

सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातील साधू-महंत तपोवनमधील साधुग्राममध्ये वास्तव्यास येतात. यावेळी साधू-महंतांसह भाविकांची संख्या लक्षणीय वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नाशिक महापालिकेने शहराच्या नेहमीच्या पाणी आरक्षणासह कुंभमेळ्यात पिण्यासाठी ६३५ दशलक्ष घनफूट पाणी स्वतंत्र आरक्षित करण्याची मागणी केली होती. पालकमंत्री महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली आहे. साधू-महंत व भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन हे स्वतंत्र आकस्मिक आरक्षण मंजूर करण्यात आले आहे.