नाशिक – नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये पुढील होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात तब्बल आठ ते १० कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. या काळात कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रशासनासमोर अनेक आव्हाने आहेत. कुंभमेळ्यातील अशी आव्हाने पेलण्यासाठी ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या स्वयंसेवकांची मोठी फौज प्रशासनाच्या मदतीला उतरणार आहे.

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने नियोजनाची व्यापक तयारी सुरू केली आहे. या महाआयोजनात आध्यात्मिक व सामाजिक संस्थांचाही सक्रिय सहभाग वाढत आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी बेंगळुरू येथील द आर्ट ऑफ लिव्हिंग फाऊंडेशन आश्रमात श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली. यावेळी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत सखोल चर्चा झाली. मंत्री महाजन यांनी रविशंकर यांना आगामी कुंभमेळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले असून ते त्यांनी स्वीकारले आहे. यावेळी मंत्री महाजन यांनी राज्य शासनाकडून कुंभमेळ्यासाठी सुरू असलेली विकास कामे, पायाभूत सुविधा व वाहतूक व्यवस्थेची कामे, स्वच्छता अभियान तसेच गर्दी नियंत्रणासाठी आखण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती सादर केली.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक आणि धार्मिक मेळाव्यांपैकी एक मानला जातो. देश-विदेशातून कोट्यवधी भाविक या महापर्वासाठी उपस्थित राहत असल्याने प्रशासनासमोर गर्दी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, आपत्कालीन प्रतिसाद, वाहतूक नियंत्रण, हरवलेल्यांना मदत, स्वच्छता आणि भाविकांना मार्गदर्शन यांसारखी मोठी आव्हाने उभी राहतात. अशा परिस्थितीत प्रशिक्षित आणि सेवाभावी स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. या अनुषंगाने ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेच्या स्वयंसेवक नेटवर्कचे सहकार्य मिळावे, अशी विनंती मंत्री महाजन यांनी केली. त्यावर रविशंकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत कुंभमेळ्यासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपलब्ध करून देण्यात येतील आणि ते कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा व समर्पण भावाने योगदान देतील, अशी ग्वाही दिली.

कुंभमेळा व्यवस्थापनात योगदान

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे स्वयंसेवक देशभरात विविध सामाजिक, आध्यात्मिक आणि आपत्ती व्यवस्थापन उपक्रमांमध्ये कार्यरत आहेत. भाविकांना मार्गदर्शन, गर्दी नियंत्रणात प्रशासनाला सहाय्य, शिस्तबद्ध रांग व्यवस्था, स्वच्छता जनजागृती, मानसिक समुपदेशन आणि सेवा उपक्रम यामध्ये त्यांचे योगदान कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार असल्याचे मानले जात आहे. राज्य शासन आणि सामाजिक-आध्यात्मिक संस्थांमधील समन्वय आगामी कुंभमेळा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भक्तिमय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.