नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमिवर, गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना आणि गोदावरी पात्रात पानवेलींचे अथांग साम्राज्य पसरलेले असताना या नद्यांच्या स्वच्छतेसाठी महापालिकेने आता ८० कंत्राटी कामगारांची फौज उतरवण्याची तयारी चालविली आहे. गोदावरीसह वालदेवी, नंदिनी, वाघाडी, कपिला यासह इतर उपनद्यांच्या दोन्ही बाजुला १०० फूट अंतरापर्यत दररोज त्यांच्यामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
गोदावरी संवर्धन कक्षाने या संदर्भातील प्रस्ताव तयार केला असून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत यावर निर्णय होणार आहे. गोदावरीला प्रदूषणाच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी महापालिकेने कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, सुमारे दीड हजार कोटींची सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणी आणि अस्तित्वातील केंद्राच्या सक्षमीकरणाची कामे हाती घेतली आहेच. काही ठिकाणी सांडपाणी थेट नदीपात्रात मिसळते. या वाहिन्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन केल्याचे सांगितले जाते.
आता आणखी नवीन मार्ग अवलंबला जात आहे. नदीलगतच्या पात्रात कळत नकळत निर्माल्य, प्रसाद सामग्री टाकली जाते. धार्मिक विधीसाठी देशभरातून येणाऱ्या भाविक व पर्यटकांसमोर नाशिक महापालिकेची प्रतिमा मलीन होत आहे. गोदावरी नदीच्या उपनद्यांच्या काठालगत नागरी वस्ती व झोपडपट्ट्या आहेत. काही ठिकाणी कचरा, घाण, निर्माल्य पात्रात टाकले जाते. यामुळे प्रवाहातही अडचणी येतात परिसरात डास, दुर्गंधी व रोगराई पसरण्यास हातभार लागतो.
ही एकंदर परिस्थिती लक्षात घेऊुन महापालिकेने नदी स्वच्छतेसाठी ८० अकुशल कामगार नेमण्याचे नियोजन केले आहे. गोदावरी प्रदूषणासंदर्भात दाखल जनहित याचिकेत न्यायालयाने नद्यांची स्वच्छता राखण्याचे आदेश दिले आहेत. मनपाकडे पुरेसे सफाई कामगार नसल्याने या कामगारांमार्फत गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या दोन्ही तिरांवर १०० फूट परिसर साफसफाई करून स्वच्छ ठेवणे, नदीपात्रातील पाणवेली काढणे, प्लास्टिक व कचरा सफाई करण्याची कामे केली जातील.
पावसाळ्याचा कालावधी वगळून यासाठी अडीच कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या संदर्भात निविदा काढून उपरोक्त कामासाठी प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक नगरी सज्ज होत असताना, गोदावरीसह तिच्या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी कंत्राटी कामगार नेमले जातील. याआधी नदीपात्रात कचरा टाकू नये म्हणून रामकुंड परिसरात कंत्राटी कामगारांची नियुक्ती झाली होती. पानवेली काढण्यासाठी बराच निधी खर्च होतो.
गोदावरी नदीसाठी सर्वाधिक कामगार
नाशिक शहरातून गोदावरी नदी साधारणत: २१ किलोमीटर अंतरापर्यंत वाहते. गोदावरी स्वच्छतेसाठी सर्वाधिक ३५ कामगार नियुक्त केले जातील. तर वालदेवी नदीसाठी सहा, नंदिनी नदीसाठी १५, वाघाडीसाठी आठ, कपिलासाठी सहा आणि इतर उपनद्यांसाठी १० असे ८० कामगार नेमण्याचे नियोजन आहे.
