नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यात ज्या गोदावरीत डुबकी मारून भाविक पापक्षालन करणार आहेत, त्या नदीचे पाणी आचमन तर दूरच, साध्या स्नानासाठीही योग्य नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून समोर आले आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेली गोदावरी केवळ नावापुरती उरली असून, जैविकदृष्ट्या ती पूर्णपणे मृत झाल्याचे गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला देत पर्यावरणप्रेमींनी गोदावरी मृत होईपर्यंत दुर्लक्ष करणाऱ्या नाशिक महापालिका आणि दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. मंडळाने काही दिवसांपूर्वी गोदावरी-कपिला संगम (तपोवन), दसक परिसर (नांदूर) आणि समतानगर (टाकळी परिसर) येथील गोदापात्रातील पाण्याचे नमुने घेतले होते. त्यात पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण शून्यावर आले असून, ही बाब नदीच्या जैविक मृत्यूचा दाखला असल्याचे म्हटले आहे. या विषारी पाण्यात मासे किंवा अन्य कोणताही जलचर जिवंत राहणे अशक्य बनले आहे. तपोवन येथे पाण्यातील बीओडीचे प्रमाण सुरक्षित मानकापेक्षा २८ पट जास्त आहे. पाणी करडे पडले असून, त्याला प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे अहवालात म्हटले आहे. सीओडीचे प्रमाण नदीत घातक औद्योगिक रसायने व विषारी घटक असल्याचे, तर फिकल कॉलिफॉर्मवरून प्रक्रिया न केलेले मलजल नदीत मिसळत असल्याचे दिसून येते, याकडे याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी लक्ष वेधले.

कुंभमेळ्यात पुढील काळात भाविक स्नानासाठी येणार आहेत; मात्र त्या गोदावरीचा नैसर्गिक श्वास थांबलेला आहे. गोदावरी आज जिवंत जलस्रोत राहिलेली नसून, ती विनाप्रक्रिया सोडलेले सांडपाणी, मानवी विष्ठा व घातक रासायनिक कचरा वाहून नेणारी उघडी गटार बनल्याचा आक्षेप पर्यावरणप्रेमींकडून घेतला जात आहे.

प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी

ध्वजारोहणाने कुंभमेळ्याची नांदी झाली असताना गोदावरीचे पाणी आचमन तर दूरच, साध्या स्नानासाठीही अयोग्य आहे. या पाण्यामुळे त्वचेचे विकार, विषमज्वर, कॉलरा व यकृताचे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असल्याकडे पर्यावरणप्रेमींकडून लक्ष वेधले जात आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही महापालिका व संबंधित प्रशासकीय यंत्रणा गोदावरीत जाणारे सांडपाणी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केला.

‘न्यायालयासमोर अहवाल ठेवणार…’

कुंभमेळ्याच्या भव्य-दिव्य आयोजनाचा देखावा तयार करणाऱ्या प्रशासनाला गोदावरीच्या अस्तित्वाची चाड उरलेली नाही. गोदावरी प्रदूषण प्रकरणी दाखल याचिकेवर ३ नोव्हेंबरला सुनावणी होत आहे. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा अहवाल न्यायालयासमोर ठेवला जाईल. नदी मृत होईपर्यंत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे पंडित यांनी सांगितले.