Nashik Airport Expansion / नाशिक – विमानतळ विस्तारीकरणामुळे नाशिक हे औद्योगिक गुंतवणुकीचे प्रमुख केंद्र बनणार आहे. दावोसमध्ये नाशिकसाठी तब्बल १३ हजार कोटींचे गुंतवणूक करार झाले. महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीने ३५ हजार स्कॉर्पिओं निर्यातीची मागणी मिळवत विक्रम प्रस्थापित केला. नाशिक हे वाहन उद्योगात महत्वाचे ठिकाण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखीत केले.

रविवारी नाशिक विमानतळ विस्तारीकरण आणि नवीन एकात्मिक इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, या प्रकल्पाने नाशिकचा विकास खऱ्या अर्थाने भरारी घेणार असल्याचे त्यांनी सूचित केले. गुंतवणुकीसाठी विमानतळ अत्यंत महत्वाचे असते. जिथे विमानतळ, तिथे उद्योग जातात.

कुंभमेळा होणाऱ्या धार्मिक, ऐतिहासिक नगरीत आधुनिक विमानतळ काळाची गरज आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी सरकारने सुमारे ३० हजार कोटींची कामे हाती घेतली आहेत. गोदावरी निर्मल व अविरल राखण्यासाठी प्रत्येक थेंब प्रक्रिया होऊन गेला पाहिजे, याकडे लक्ष दिले जात आहे.

नाशिकचा रिंगरोड चार राष्ट्रीय आणि चार राज्य महामार्गांना जोडतो. नाशिकच्या विकासाचे तो इंजिन ठरेल. उद्योग व लॉजिस्टिक हब विकसित होईल. सुरत-चेन्नई आणि अन्य महामार्गांनी नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राला प्राधान्य मिळणार आहे. कार्गो सुविधेने नाशवंत कृषिमालास परदेशी बाजारपेठ खुली होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

मागील काळात नाशिकमध्ये ५५ हजार कोटींची गुंतवणूक झाली. दावोसमध्ये नाशिकसाठी १३ हजार कोटींची गुंतवणूक निश्चित झाली. या ठिकाणी इलेक्ट्रिक उद्योग, लढाऊ विमानांशी संबंधित लघू उद्योग येणार असल्याचे ते म्हणाले.

प्रयागराजच्या कुंभमेळ्याने भाविकांच्या गर्दीने आजवरचे सर्व विक्रम तोडले. नाशिक-त्र्यंबकेश्वरला पुढील वर्षी २०१५ च्या कुंभमेळ्याच्या तुलनेत आठ ते १० पट जास्त भाविक येणार असून त्या अनुषंगाने व्यापक तयारी सुरू आहे. महापालिका निवडणुकीत नाशिककरांनी भाजपवर विश्वास दाखवला. या विश्वासाची परतफेड नाशिकच्या शाश्वत विकासातून केली जाणार आहे.

राज्य सरकार नाशिक शहर व जिल्ह्याच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांचीही भाषणे झाली. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, महापौर हिमगौरी आडके, आमदार सीमा हिरे आदी उपस्थित होते.

महिंद्राची कामगिरी…

Mahindra Scorpio / महिंद्रा ॲण्ड महिंद्रा समुहाने ३५ हजार स्कॉर्पिओ निर्यातीची ऑर्डर मिळवत विक्रम प्रस्थापित केल्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात लक्ष वेधले. त्यांनी ज्या ऑर्डरचा दाखला दिला, त्या स्कॉर्पिओ महिंद्रा कंपनीच्या नाशिक प्रकल्पात तयार केल्या जातात. इंडोनेशियात ३५ हजार स्कॉर्पिओ निर्यात केल्या जाणार आहेत. देशातील प्रमुख वाहन उत्पादन केंद्र म्हणून नाशिकची कामगिरी या माध्यमातून ठळकपणे समोर आली.