नाशिक – एकिकडे सिंहस्थ कुंभमेळ्याची ३१ ऑक्टोबर रोजी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ध्वजारोहणाने नांदी होणार असताना, कुंभमेळ्याची संथ कामे हा संत, महंतांच्या नाराजीचा विषय झाला आहे.  याआधी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत संजयदास महाराज यांनी नाशिकमध्ये येताच कुंभमेळ्याची संथ कामे आणि नियोजनात असलेल्या त्रुटींवर बोट ठेवले होते. त्यात आता श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याचे महंत मुरलीदास महाराज यांनी भर घातली आहे. त्यांनी तर रामकुंडावरील पायऱ्यांपासून मांस, मच्छीची दुकाने, साधुग्राम अशा सर्वच विषयांवरुन प्रशासनावर टिकास्त्र सोडले. त्यामुळे उर्वरित काळात साधू, महंतांची नाराजी कमी करण्यासाठी प्रशासनासह कुंभमेळा मंत्र्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याची कामे संथपणे सुरु असल्याबद्दल याआधी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते महंत संजयदास महाराज यांनी नाराजी व्यक्त केली होती. सिंहस्थ कुंभमेळा जवळ आला असतानाही अनेक विकासकामे अर्धवट आहेत. साधूग्राम तसेच अनेक कामे संथपणे होत आहेत. साधूग्रामसाठी भूसंपादन रखडले आहे. कुंभमेळ्याच्या नियोजनात ‘साधुग्राम’ला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. असे असताना प्रशासनाकडून साधूंसाठी भूखंड आखणी करून जागा सोपविण्याचे कामही पूर्ण करण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांना पूर्वीचा मोबदलाही मिळालेला नसल्याचे सांगण्यात येते. नाशिक महापालिकेने शेतकऱ्यांचे पैसे त्वरीत देण्याची गरज आहे. तसे न केल्यास साधू शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहतील, असा इशारा महंत संजयदास महाराज यांनी दिला होता.

तोच सूर श्री पंच निर्वाणी अनी आखाड्याचे महंत मुरलीदास महाराज यांनी आळवला. गुरुवारी रामकुंडावरील तयारीची पाहणी महंत मुरलीदास महाराज, महंत नरेंद्रदास, महंत हेमंतदास, महंत संजयदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज यांनी केली. रामुकंडासह अमृत मार्गाची परिस्थिती पाहूंन त्यांनी नाराजी व्यक्त केली. कुंभमेळ्याची कामे संथपणे सुरु असून आतापर्यंत साधुग्रामची जागा साधूंकडे हस्तांतरीत होणे आवश्यक होते. कुंभमेळ्यास आता केवळ  आठ नऊ महिन्यांचा कालावधी बाकी आहे. त्यात काय तयारी होणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हीच परिस्थिती कायम राहिल्यास नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याला यावे की नाही, याचा विचार करावा लागेल, असा इशाराही महंत मुरलीदास महाराज, महंत संजयदास महाराज यांनी दिला.

कुंभमेळ्याच्या तयारीविषयी समाधानी नसून प्रशासन बेपर्वाई करीत आहे. प्रयागराजला कुंभमेळ्याची कित्येक दिवस आधीच तयारी पूर्ण झाली होती. तेथील कुंभमेळा भव्यदिव्य होऊ शकला, त्यामागील ते एक कारण आहे. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी लवकर विस्तीर्ण जागा द्यावयास हवी. कुंभमेळ्याची जागा पवित्र असल्याने या ठिकाणी अद्याप मद्य, मांस, मच्छीची दुकाने सुरु असल्याबद्दल महंतांनी नाराजी व्यक्त केली. हे आमच्या तत्वाविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. रामुकंडावर उतरण्यासाठी उभ्या पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे दुर्घटना होण्याची भीतीही त्यांनी व्यक्तकेली. साधू, महंतांना उतरण्यासाठी सपाट पायऱ्यांची गरजही त्यांनी मांडली.