नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, महावितरणने वीज सेवा अधिक गतिमान करण्यासाठी अत्याधुनिक भुयारी वाहिन्या तपासणीसाठी खास वाहन (केबल टेस्टिंग व्हॅन) सज्ज केले आहे. या दोन नवीन वीज वाहिन्या तपासणी वाहनांचे फित कापून लोकार्पण करण्यात आले. जमिनीखालून गेलेल्या भूमिगत वीज वाहक वायरमधील बिघाड शोधणारी केबल टेस्टिंग व्हॅन एक फिरती प्रयोगशाळा मानली जाते. डिजिटल व्यवस्थेमुळे भूमिगत वायरमधील दोष अल्पावधीत शोधणे दृष्टीपथास आले आहे.
सातपूर येथील महावितरणच्या नाशिक चाचणी विभागीय कार्यालय येथे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते आणि महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. महावितरणच्या तयारीचे कौतुक करीत या आधुनिक यंत्रणेमुळे कुंभमेळा काळात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत मिळेल, असा विश्वास आयुक्त सिंह यांनी व्यक्त केला. मुख्य अभियंता लटपटे यांनी अखंडित वीज पुरवठ्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले.
भूमिगत वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास ते शोधून दुरुस्त करण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज करण्यात आल्याचे नमूद केले. यावेळी आयुक्त सिंह यांनी वीज वाहिन्या तपासणी वाहनात जाऊन पाहणी करुन कार्यपद्धती समजून घेतली. या कार्यक्रमास कार्यकारी अभियंता प्रदीप दाळू आणि गोपाल पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिनेश चावडा, जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांच्यासह चाचणी विभागाचे अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.
केबल टेस्टिंग व्हॅनचे स्वरुप
जमिनीखालून गेलेल्या भूमिगत वीज वाहक वायरमधील बिघाड शोधण्यासाठीची एक फिरती अत्याधुनिक प्रयोगशाळा म्हणजे केबल टेस्टिंग व्हॅन. जेव्हा एखादी भूमिगत वायर खराब होते, तेव्हा नेमका बिघाड कुठे झाला, हे शोधण्यासाठी संपूर्ण रस्ता किंवा जमीन खणणे शक्य नसते. अशा वेळी या तपासणी वाहनाचा वापर केला जातो. या व्हॅनमुळे बिघाडाचे अचूक ठिकाण कळते, त्यामुळे कमीत कमी खोदकामात दुरुस्ती शक्य होते. आणि वीज पुरवठा लवकर पूर्ववत होतो.
जमिनीखाली वायर नेमकी कुठून आणि किती खोलीवरून गेली आहे, याचा अचूक मार्ग शोधणे. वायर ओळखणे, एकाच ठिकाणी अनेक वायर असल्यास, नेमकी बिघाड झालेली वायर कोणती आहे ते ओळखणे. तासंतास किंवा दिवसभर शोधण्यात जाणारा दोष काही मिनिटांत किंवा तासांत अचूक सापडतो. विनाकारण पूर्ण रस्ता किंवा पदपथ खणावा लागत नाही, ज्यामुळे मोठा खर्च वाचतो. आधुनिक डिजिटल व्यवस्थेमुळे बिघाड आणि दोषाचे नेमके ठिकाण मिळते.
