नाशिक – शहराला अध्यात्म व धार्मिकतेचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने हा ऐतिहासिक वारसा शासन जतन करत आहे. अयोध्येत भव्य राम मंदिर उभे राहिले आहे. याच धर्तीवर तपोवनात भव्य श्रीराम मंदिर उभारण्यात येईल, अशी घोषणा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी केली.

सिडकोतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ पवननगर मैदानात आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे अनुपस्थित होत्या. मनपा निवडणुकीत तपोवनात साधुग्रामसाठी चिन्हांकीत १८२५ वृक्षतोडीचा विषय गाजत आहे. यावरून तपोवन वाचवा चळवळीतील आंदोलक आणि कुंभमेळामंत्री महाजन यांच्यात अनेकदा वाद झाले आहेत. पर्यावरणप्रेमींनी महापालिका निवडणुकीत तपोवनातील वृक्ष वाचविण्याची भूमिका घेणाऱ्यांच्या मागे उभे राहण्याची तयारी केली आहे. ठाकरे बंधूंच्या सभेत वृक्षतोडीवरून मंत्री महाजन यांना लक्ष्य करण्यात आले होते. यामुळे भाजपच्या नेत्यांना या विषयावर भाष्य करणे व प्रत्युत्तर देणे क्रमप्राप्त ठरल्याचे चित्र आहे. सिडकोतील जाहीर सभेत मंत्री महाजन यांनी त्याचा संदर्भ देत कुंभमेळ्यानिमित्त शहरातील वेगवेगळ्या भागात १५ ते २० हजार झाडे लावली जाणार असल्याचे नमूद केले. अयोध्येच्या धर्तीवर तपोवनात श्रीराम मंदिर उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.

आगामी कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्यावतीने ३० हजार कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे नाशिक शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे. शहराच्या भविष्यकालीन २५ ते ३० वर्षांची लोकसंख्या विचारात घेऊन विकास कामांचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक परिक्रमा मार्ग, पाणी पुरवठा, सिमेंटचे रस्ते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अशी असंख्य कामे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सूचित केले. मागील कुंभमेळ्यात आपण पालकमंत्री होतो. यावेळी पालकमंत्री नसलो तरी काही बिघडत नाही. यामुळे कुठलेही काम अडणार नाही. २०१५ प्रमाणे आगामी कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी महापालिकेत भाजपचाच महापौर असला पाहिजे. सिडकोतील त्रिमूर्ती चौक भागात उड्डाण पूल उभारण्यासाठी तरतूद केली जाईल. या भागातील वीज तारा भूमिगत करणे, भूमिगत गटार व रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिले.

दरम्यान, सिडकोत एबी अर्जाच्या गोंधळामुळे तीन जागांवर पक्षाचे पुरस्कृत उमेदवार आहेत. यातील दोघांनी जाहीर माघार घेतली असली तरी एका जागेवर माघार घेण्यास नकार देणाऱ्या भाजपच्या माजी नगरसेविका अलका अहिरे आणि भाजपचे पदाधिकारी कैलास अहिरे यांची आणि नंतर क्रमांक २९ ‘अ’ मधून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याप्रकरणी माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. माजी नगरसेविका अलका अहिरे यांना भाजपचे पक्षचिन्ह मिळाले आहे. या गोंधळामुळे भाजपला सिडकोत अधिक लक्ष द्यावे लागत आहे.