नाशिक – सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून नाशिक परिसरातील पाच महत्त्वाच्या स्थानकांवर पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकणे यांचा समावेश आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येण्याची अपेक्षा असल्याने, प्रवासी हाताळणी क्षमता वाढविणे, रेल्वे संचालनात अधिक लवचिकता आणणे, गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन करणे तसेच प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे, या उद्देशाने ही कामे केली जात आहेत. यामध्ये अतिरिक्त प्रवासी फलाटांची उभारणी , यार्ड पुनर्रचना कामे, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणालीची स्थापना, अतिरिक्त लूप लाईन्स आणि स्टेबलिंग लाईन्सची निर्मिती , रॅम्पसह रेल्वे पादचारी पूल, फलाटावरील आच्छादन आदी कामांवर भर देण्यात येणार आहे. रेल्वे व्यवस्थापनाकडून देवळाली स्थानक परिसरात अतिरिक्त उच्चस्तरीय प्रवासी फलाटाचे बांधकाम, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कामे, स्टेबलिंग सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प , रॅम्पसह रेल्वे पादचारी पूल आणि होल्डिंग एरियांचा विकास यांचा समावेश आहे.

नाशिक रोड परिसरात कुंभ पर्वात होणारी गर्दी पाहता १२ मीटर रुंद आणि सहा मीटर रुंद अशा दोन पादचारी पुलांचे बांधकाम सुरू आहे. विद्यमान प्रवासी वाहतूक व्यवस्थेचे नूतनीकरण व सुधारणा, फलाटांवरील आच्छादन क्षेत्रफळात वाढ, अतिरिक्त पाणीपुरवठा सुविधा, स्वच्छतागृहे आणि स्थानकाच्या परिसरातील सुधारणा यांचा कामांमध्ये समावेश आहे. विशेषतः, अमृतस्नान आणि इतर प्रमुख स्नानदिवशी अपेक्षित असलेल्या मोठ्या भाविक गर्दीचा विचार करून गर्दी नियंत्रण, प्रवाशांची सुरक्षित हालचाल यावर विशेष भर दिला जात आहे.

याशिवाय ओढा स्थानकात आवश्यक जमीन संपादन प्रक्रियेत लक्षणीय प्रगती झाली आहे. सुमारे ३.४३ हेक्टर जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून मेमध्ये संबंधित जमिनीचा ताबा घेण्यात आला. याशिवाय, अतिरिक्त ०.१ हेक्टर जमिनीच्या पूरक संपादनाची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. संपादित तसेच प्रस्तावित जमिनीच्या क्षेत्रांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आली आहे. खेरवाडी स्थानकात फलाटांचा विकास, रॅम्पसह पादचारी पूल, स्थानक परिसरातील परिसंचरण क्षेत्राचा विकास तसेच विविध प्रवासी सुविधा करण्यात येणार आहेत. कुंभमेळा दरम्यान वाढीव प्रवासी वाहतूक हाताळण्यासाठी कसबे सुकणे स्थानकाचाही सर्वांगीण विकास केला जात आहे. जमीन संपादन प्रक्रिया जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाच्या समन्वयाने सुरू आहे. संयुक्त मोजणी नोंद संबंधित कामे पूर्ण झाली असून, फेरफार आणि जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून प्रस्तावित जमीन संपादन क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्यात आली आहे. कुंभमेळा संचालनादरम्यान कार्यक्षम रेल्वे संचालन आणि प्रवासी व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने खेरवाडी स्थानकाचा विकास केला जात आहे. या कामांमध्ये फलाटांचा विकास, अतिरिक्त स्टेबलिंग लाईन्स, रॅम्पसह पादचारी पूल तसेच विविध प्रवासी सुविधांचा समावेश आहे. खेरवाडी येथील जमीन संपादनाची कामेही प्रगतीपथावर आहेत. यापूर्वी संपादित केलेल्या जमिनींचा ताबा घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, अतिरिक्त जमिनीसाठी पूरक जमीन संपादन आणि फेरफार प्रक्रिया सुरू आहे.

कसबे सुकणे स्थानकाचाही सर्वांगीण विकास केला जात आहे. जमीन संपादन प्रक्रिया जिल्हा प्रशासन आणि महसूल विभागाच्या समन्वयाने सुरू आहे. संयुक्त मोजणी नोंद संबंधित कामे पूर्ण झाली असून, फेरफार आणि जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

प्रवासी सुविधा आणि नियंत्रण कक्ष

कुंभ मेळ्याच्या गर्दीच्या दिवसांमध्ये प्रभावी गर्दी व्यवस्थापनासाठी सर्व पाच स्थानकांवर स्वतंत्र प्रवासी नियंत्रण कक्ष विकसित केले जात आहेत. याशिवाय, प्रत्येक स्थानकावर अतिरिक्त स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा सुविधा, परिसंचरण क्षेत्र आणि वाहतुकीच्या जागा तसेच प्रवासी निवारा शेड्स उभारण्यात येत आहेत. उचावरील आणि भूमिगत पाण्याच्या टाक्यांच्या बांधकामाद्वारे पाणी साठवण क्षमतेत मोठी वाढ करण्यात येत आहे. मध्य रेल्वेने स्थापत्य, ट्रॅक, सिग्नल व दूरसंचार, विद्युत विभागांची कामे टप्प्याटप्प्याने आणि परस्पर समन्वयाने पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. कुंभमेळासुरू होण्यापूर्वी सर्व कामे वेगाने पूर्ण व्हावीत यासाठी विभागीय स्तरावर सातत्याने आढावा आणि देखरेख केली जात आहे.