नाशिक – आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक महानगर पालिका यांच्या वतीने भाविकांचा सुलभ प्रवास आणि गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ”रामकाल पथ ”हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प हाती घेतला असून सध्या या प्रकल्पाचे काम सुरु आहे.
कुंभमेळ्यात देश-विदेशातुन होणारी भाविकांची गर्दी तसेच शहरातील तरंगती गर्दी याचा विचार करता बाहेरून येणाऱ्या भाविकांना गोदाकाठावरील रामाचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांचे विनासायास दर्शन घेता यावे, हा रामकाल पथ तयार करण्यामागील उद्देश आहे. हा पथ म्हणजे सुमारे १.३६ किलोमीटर लांबीचा एक आध्यात्मिक आणि वारसा मार्ग आहे. पंचवटी परिसरातील सीता गुंफा, काळाराम मंदिर, गोदाघाट आणि रामकुंड यांसारख्या ऐतिहासीक स्थळांना जोडणारी ही मुख्य मार्गिका आहे. या मार्गिकेमुळे कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविकांना परिसरातील धार्मिक स्थळांचे दर्शन सहजपणे घेता येऊ शकेल. तसेच गर्दीचे योग्य नियंत्रणही करता येईल.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रामकाल पथ प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यात आला आहे. नाशिक महानगरपालिकेद्वारे अंमलात आणल्या जाणाऱ्या या प्रकल्पातंर्गत वारसा संवर्धनासह सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. वारसा संवर्धन विकास हा या प्रकल्पाचा गाभा असून, रामकुंड परिसरातील मूळ शहरी रचना अबाधित ठेवत नियोजन करण्यात आले आहे. दैनंदिन भाविक तसेच कुंभमेळ्यातील गर्दीचा विचार करून पादचाऱ्यांसाठी सुविधा, सार्वजनिक जागा आणि आवश्यक सोयीसुविधांचा समतोल साधत रामकाल पथावर वेगवेगळ्या संकल्पनेवर काम सुरू आहे. यासाठी केंद्र शासनाच्या स्पेशल असिस्टन्स टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट योजनेअंतर्गत निधी प्राप्त झाला आहे. या प्रकल्पात रामकुंड, काळाराम मंदिर आणि सीतागुंफा या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे.
या प्रकल्पाचे वैशिष्टये म्हणजे रामकुंड परिसरात भाविकांना विविध सुविधा दिल्या जात असतांना मंदिर परिसरातील इमारतींचे पुनर्संचयितीकरण मूळ स्थापत्यशैलीशी सुसंगत साहित्य आणि तंत्र वापरून केले जात आहे. यासाठी नक्षीकाम, स्थापत्यशैलीतील साधेपणा, प्रमाणबद्धता आणि स्थानिक साहित्याचा वापर यावर आधारित आराखडा तयार करण्यात आला आहे. काळाराम मंदिर परिसरातील वास्तुशैलीशी सुसंगत राहील, अशा प्रकारे रचना विकसित करण्यात आली.
रामकाल पथ मार्गावरील भिंतींवर दुतर्फा रामायणातील काही प्रसंग रेखाटण्यात येत आहेत. यासाठी आकर्षक रंगसंगतीचा वापर करण्यात आला आहे. घाट सुशोभिकरणासह वेगवेगळी कामे याअंतर्गत सुरु आहेत. दुसरीकडे, भाविकांच्या सुविधांसह स्थानिक उपजीविकेचा विचार करून स्वतंत्र विक्रेता क्षेत्र (वेंडिंग झोन) विकसित करण्यात येत आहे. जे रामकाल पथच्या आराखड्याचा अविभाज्य भाग आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक त्या ठिकाणी इमारती हटविण्यात आल्यास संबंधितांना बांधकाम टीडीआरचा वापर करून पीपीपी तत्त्वावर पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
वारसा जपत नियोजन
नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी रामकाल पथ प्रकल्प नाशिक महानगरपालिकेद्वारे वारसा जपत, स्थानिक रचना न बिघडवता राबविण्यात येत असल्याचे सांगितले. नियोजित फेरीवाला क्षेत्र आणि सुधारित सार्वजनिक सुविधा यांचा समावेश या प्रकल्पातंर्गत करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी पुनर्विकास आवश्यक होता, तेथे पीपीपी तत्त्वावर बांधकाम टीडीआरचा वापर करून पर्यायी घरे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले.
