नाशिक – आगामी कुंभमेळ्याच्या काळात गोदावरी प्रदुषित होणार नाही, यासाठी शासनाने लक्ष द्यावे. प्रदुषणामुळे निसर्गाची हानी होते. त्यामुळे कुंभमेळ्याच्या तयारीत पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य हवे. दर बारा वर्षांनी कुंभमेळा येतो आणि साधुग्रामच्या जागेचा प्रश्न निर्माण होतो. नाशिकचा कुंभमेळा अन्य जिल्हात भरवता येणार नाही. त्यामुळे साधू, संतासाठी साधुग्रामची जागा कायमस्वरूपी आरक्षित ठेवण्याचा निर्णय शासनाने घ्यावा अशी मागणी जगदगुरु नरेंद्र महाराज यांनी केली.

नरेंद्राचार्य महाराज नाशिक येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. साधुग्रामसाठी जमिन अधिग्रहित करतांना शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये. शासनाने संबंधित शेतकऱ्यांना त्यांचे पैसे वेळेत द्यावे. कुंभमेळ्याला अडथळा निर्माण करण्याची भूमिका शेतकऱ्यांची नाही. मात्र त्यांच्या हक्कांचे सरक्षण करणे शासनाची जबाबदारी आहे. या प्रश्नात शासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास साधू, संत मध्यस्थी करतील, असे नरेंद्राचार्य महाराज यांनी सांगितले. दुष्काळाच्या सावटाखाली राज्य आहे. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बियाणे, जनावरांना चारा आणि गरजूंना अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी साधू, संत पुढाकार घेतील. झाडे लावली पाहिजेत, झाडे जगवली पाहिजे आणि वृक्षांचे संरक्षण झाले पाहिजे हीच आमची भूमिका आहे.

मात्र सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर साधुग्रामसाठी निश्चित केलेल्या जागेचा प्रश्नचही महत्वाचा आहे. त्यामुळे कुंभमेळ्यासाठी जेवढी आवश्यकता आहे तेवढीच वृक्षताेड करून त्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर पुनर्रोपण करावे आणि पर्यावरण व विकासाचा सुवर्णमध्य साधावा, अशी मागणी त्यांनी केली. साधु संतानी ज्या जागेवर अध्यात्मिक अनुष्ठाने केली आहेत, ती जागा सोडून अन्यत्र जाणे शक्य नाही. त्यामुळे शासनासमोरही काही अडचणी आहेत. या परिस्थितीचा विचार करून समाजानेही सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.

साधू, संत सरकारला अडचणीत आणणार नाहीत. सिंहस्थासाठी साधुग्राम उभारतांना पाणी, सुविधा आणि इतर आवश्यक बाबींचा प्रश्न आहे. मात्र साधू संतानी सरकारसमोर अवास्तव मागण्या ठेवू नयेत. थोड्याफार सुविधांमध्ये साधु महंत राहु शकतात. सिंहस्थाला अजून सात ते आठ महिन्यांचा कालावधी आहे. पावसाळ्यात पाण्याची उपलब्धता वाढेल. त्यामुळे सध्या पाण्याच्या प्रश्नाचे भांडवल करण्याची गरज नाही असे नरेंद्राचार्य महाराज यांनी स्पष्ट केले.