नाशिक – आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकसह त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ राहणार आहे. वेगवेगळ्या पर्वणींच्या काळात ३० लाखांहून अधिक भाविक नाशिक व त्र्यंबकनगरीत दाखल होणार आहेत. त्यांच्या शुधाशांतीसाठी जिल्हा परिसरातील बचत गट सक्रिय झाले आहेत. नाशिकच्या रानमेव्यासह येथील खाद्यसंस्कृती बाहेरगावाहून येणाऱ्या पर्यटकांना व भाविकांना अनुभवता येणार आहे. यामध्ये अस्सल मराठमोळे पिठलं-भाकरी, ठेचा-भाकरी, नाचणीची भाकरी यासह विविध पर्याय खवय्यांसाठी उपलब्ध राहणार आहेत.
प्रयागराज येथे झालेल्या कुंभमेळ्यानंतर भव्य स्वरूपात होणाऱ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात कुठलीही कमतरता राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने विविध विकासकामांनी वेग घेतला असून शहराचा चेहरामोहरा बदलण्यावर भर दिला जात आहे. प्रशासकीय पातळीवर नियोजनकौशल्याचा कस लागत असताना दुसरीकडे हा कुंभमेळा अनेकांसाठी रोजगाराची संधी ठरत आहे. कुंभमेळ्याच्या माध्यमातून अनेकांना काम मिळणार असून जिल्हा परिसरातील ८० हजारांहून अधिक बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषद सक्रिय झाली आहे. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, हरसूल आदी भागांतील बचत गटांना एकत्र घेऊन कामांची आखणी केली जात आहे.
यामध्ये विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना पर्वणीच्या काळात स्वच्छ, ताजे आणि घरगुती चवीचे अन्नपदार्थ मिळावेत, याची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. पर्वणीसाठी आलेल्या भाविकांना व पर्यटकांना विशिष्ट अंतर पायी चालल्यानंतर स्नानासाठी घाट किंवा इच्छित स्थळ गाठावे लागणार आहे. पर्वणीचा कालावधी ऐन पावसाळ्यात असल्याने गढूळ पाणी, बदलते वातावरण यामुळे त्यांना आरोग्यविषयक विविध अडचणी येऊ शकतात. हे लक्षात घेऊन सकस व पौष्टिक खाद्यपदार्थांवर भर देण्यात येणार आहे.
फूड कोर्टची संकल्पना
जिल्हा परिषदेच्या वतीने एकल महिला व बचत गटांच्या माध्यमातून ठिकठिकाणी फूड कोर्ट सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये चालणाऱ्यांची संख्या लक्षात घेता लहान आकारातील पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, फुलक्याच्या आकारातील पोळ्या, भाकरीचे विविध प्रकार, झुणका, पिठलं, तांदळाचे विविध पदार्थ यासह नाशिकची ओळख असलेली कडधान्यांची मिसळ असे विविध पर्याय छोट्या आकारातील खोक्यांमध्ये किंवा आकर्षक पद्धतीने थाळी सजवून दिले जाणार आहेत. त्यामुळे चालता-चालता हे पदार्थ खाता येतील. हवामानाचा अंदाज लक्षात घेता आलं, गवती चहा, तुळस यांचे मिश्रण असलेला चहा, ताक, लिंबू सरबत, विविध प्रकारची औषधी सरबते आदींचीही व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी दिली. या माध्यमातून ग्रामीण भागातील दहा हजारांहून अधिक महिलांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
