नाशिक – पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात १२ कोटी भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन निवासाची अतिरिक्त व्यवस्था उभारण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने खासगी जमिनीवर ‘टेंट सिटी’ उभारण्यासंदर्भात कार्यपद्धती निश्चित केली आहे. भाविकांना सुरक्षित व सुविधायुक्त निवास मिळावा यासाठी विविध निकष निश्चित करण्यात आले आहेत.
कुंभमेळ्यात शहरातील कायमस्वरूपी पायाभूत सुविधांवर येणारा ताण कमी करण्यासाठी या टेंट सिटी उभारण्यात येणार आहेत. निवासासोबतच स्वच्छतागृहे, स्नानगृहे, पाणी, वीज, कचरा व्यवस्थापन, वाहनतळ, भोजन व्यवस्था, सुरक्षा आणि आपत्कालीन सुविधांचा समावेश या तात्पुरत्या वसाहतींमध्ये करणे बंधनकारक असेल. पिण्याचे आणि इतर वापराचे पाणी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी लागेल. बिगर-पर्वणीच्या काळात सात दिवसांतून एकदा, तर प्रमुख पर्वणीच्या काळात दररोज पाण्याची गुणवत्ता तपासावी लागणार आहे. प्रत्येक टेंट सिटीसाठी प्रशासनाशी समन्वयाने स्वतंत्र आपत्कालीन कृती आराखडा तयार करावा लागेल. यात आग, गर्दीचे व्यवस्थापन, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, स्थलांतर तसेच हवामानाशी संबंधित इशाऱ्यांचा समावेश असेल. वीज व्यवस्थेसाठीही सुरक्षा निकष निश्चित करण्यात आले आहेत. खासगी जमीनमालक आणि ऑपरेटर यांना सिंहस्थाच्या व्यापक व्यवस्थेत सहभागी होण्याची संधीही या माध्यमातून मिळणार असल्याचे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी म्हटले आहे.
किमान दोन एकर जागेचे बंधन
खासगी जमीनमालक किंवा जमीनमालकाशी नोंदणीकृत करारनामा असलेले परिचालक (ऑपरेटर) टेंट सिटीसाठी अर्ज करू शकतील. प्रस्तावित जमीन खासगी मालकीची, सलग आणि बोजामुक्त असणे आवश्यक आहे. जमीन नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असावी आणि किमान दोन एकर क्षेत्रफळाची असावी. टेंट सिटी तात्पुरतीच राहणार असून, मंजूर कालावधी संपल्यानंतर सर्व तंबू व संरचना हटवून जागा पूर्ववत करावी लागणार आहे. निकषानुसार जागा उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांना या उपक्रमात सहभागी होता येईल.
नदी-नाल्यांमध्ये सांडपाणी सोडण्यास मनाई
टेंट सिटीमध्ये पुरेशी स्वच्छतागृहे, स्नानगृहे तसेच दिव्यांगांसाठी अनुकूल सुविधा उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल. नदी, नाला किंवा नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात सांडपाणी सोडता येणार नाही. उघड्यावर कचरा टाकणे किंवा कचरा जाळण्यासही मनाई असेल. कचऱ्याचे वर्गीकरण, दररोज संकलन आणि नियमांनुसार विल्हेवाट लावणे बंधनकारक राहणार आहे.
लवकरच अर्ज वितरण
खासगी टेंट सिटी उभारण्यासाठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अर्जासोबत प्रस्तावित जागेची माहिती, जमीनमालकीची कागदपत्रे, जीपीएस निर्देशांक, आराखडा, तंबूंची संख्या व प्रकार, वाहनतळ आदी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील. आपत्ती व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस विभागाशी संबंधित आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रे आणि वैधानिक परवानग्या घेणे ऑपरेटरसाठी बंधनकारक असेल.
