नाशिक – आगामी नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा नाशिकचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पर्यटन विभागही विकासाच्या स्पर्धेत मागे नाही . कुंभमेळाव्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या शासकिय योजनांची जोड देत पर्यटनाला चालना कशी मिळेल,कुंभ पर्वात येणाऱ्या भाविकांना पर्यटनासाठी काय वेगळे देता येईल यावर काम सुरू आहे. या अनुषंगाने धार्मिक पर्यटनाचे केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकची ओळख आता ‘अॅडव्हेंचर टुरिझम सिटी’ म्हणून ठळकपणे समोर येणार आहे. यासाठी पर्यटन विभाग गंगापूर धरण आणि अन्य परिसरात लवकरच हे प्रकल्प सुरू होणार आहेत.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी प्रशासकिय पातळीवर विविध कामांनी वेग घेतला असतांना नाशिक मध्ये पर्यटन विभागानेही वेगवेगळ्या योजनांचा पर्यटन वाढीसाठी उपयोग करण्यास सुरूवात केली आहे. पर्यटन संचालनालयाच्या वतीने कलाग्राम, बोट क्लब यानंतर आता गंगापूर धरण आणि कश्यपी धरणाच्या परिसरात लवकरच पॅराग्लायडिंग आणि पॅरामोटरिंगसारखे थरारक साहसी खेळ अधिकृतपणे सुरू करण्यासाठी आवश्यक पाऊले उचलली आहेत.
पर्यटन संचालनालयाच्या नाशिक विभागीय कार्यालयामार्फत या सेवा देणाऱ्या संस्थांना कायमस्वरूपी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती विभागीय उपसंचालक नंदकुमार राऊत यांनी दिली. नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात साहसी पर्यटनावर विशेष भर देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पोषक हवामान पाहता, नाशिकमध्ये या क्षेत्राला मोठी संधी आहे. गंगापूर धरणावर पॅरामोटरिंग, तर गिरणारे जवळील कश्यपी धरण आणि सुरगाणा तालुक्यातील ऐतिहासिक हतगड किल्ल्यावर पॅराग्लायडिंगचा रोमांच पर्यटकांना अनुभवता येणार आहे. यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला एक नवा आयाम प्राप्त होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, साहसी पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटन वाढणार असेल तरी सुरक्षिततेचा मुद्दा पाहता या साहसी खेळांमध्ये काही कमतरता राहिल्यास होणारे अपघात, त्यामुळे जीवितहानी कळीचा मुद्दा ठरतो. या पार्श्वभूमीवर, सेवा देणाऱ्या संस्थांची कडक तपासणी केली जात आहे. संबंधित संस्था सुरक्षा नियम आणि मानके कशा प्रकारे पूर्ण करतात, याची तांत्रिक चाचणी घेण्यात आली आहे.
अनेक संस्थांमधून एका पात्र संस्थेची निवड करण्यात आली असून, पुढील दोन दिवसांत त्यांची अंतिम सुरक्षा चाचणी घेतली जाईल. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या संस्थेला आठ दिवसांत अधिकृत प्रमाणपत्र बहाल केले जाणार आहे. पुढील काही महिन्यांत कुंभ पर्वणी अगोदर या साहसी खेळांना नाशिक जिल्ह्यात सुरूवात होणार आहे.
नाशिकसह अहिल्यानगर येथील शिर्डी येथे पॅरामोटरिंग आणि सुरगाण्यातील हतगड किल्ल्यावर पॅराग्लायडिंग सुरू करण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. हतगड येथील तांत्रिक चाचण्या सध्या सुरू असून, तेथील भौगोलिक स्थिती पॅराग्लायडिंगसाठी अत्यंत योग्य असल्याचे मानले जात आहे.
साहसी पर्यटनाकडे पर्यटकांचा कल वाढतो आहे. गंगापूर, कश्यपी आणि हतगड येथे या सुविधा सुरू झाल्यास नाशिकच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल. सुरक्षिततेच्या सर्व चाचण्या पूर्ण करूनच आम्ही संस्थांना परवानगी देत आहोत.
— नंदकुमार राऊत (उपसंचालक, पर्यटन विभाग, नाशिक)
