नाशिक – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि प्रमुख आखाड्यांच्या महंतांच्या उपस्थितीत ध्वजस्तंभाचे, गोदावरीचे विधिवत पूजन आणि आरती झाल्यानंतर ध्वजारोहणाने नाशिक येथे सिंहस्थ महाकुंभ पर्वाचा श्रीगणेशा झाला. मात्र, या सोहळ्याप्रसंगी महिला आखाड्यांना डावलण्यात आल्याचे समोर आले आहे. ध्वजारोहण सोहळ्यात मुख्य व्यासपीठावर वैष्णवपंथीय आखाड्यांच्या प्रमुख पुरुष महंतांना मानाचे स्थान देण्यात आले. परंतु, प्रशासनाने महिला आखाड्यांचा योग्य तो सन्मान राखला नाही, असा आरोप गायत्री त्रिवेणी प्रयाग पीठाच्या प्रमुख त्रिकाल भवन्ता यांनी केला.
रामकुंडावर शनिवारी दुपारी कुंभमेळ्याचे ध्वजारोहण मंत्रोच्चारांच्या जयघोषात आणि शंखनादात उत्साहात पार पडले. या सोहळ्यास त्रिकाल भवन्ता या हातात त्रिशूळ घेऊन आपल्या काही प्रमुख महिला शिष्यांसह उपस्थित होत्या. यावेळी ध्वजस्तंभालगतच्या विशेष आसन व्यवस्थेत स्थान न मिळाल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाने रामकुंडावर अतिविशेष, विशेष आणि सामान्य अशा वेगवेगळ्या श्रेणींमध्ये झोननिहाय आसन व्यवस्था केली होती. ध्वजस्तंभालगत दोन भागांत आसन व्यवस्था होती. त्यातील एका भागात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासह वैष्णवपंथीय प्रमुख महंतांना स्थान देण्यात आले होते. या ठिकाणी आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष ग्यानदास महाराज, प्रवक्ते संजयदास महाराज, नाणीज पीठाचे नरेंद्राचार्य महाराज तसेच वैष्णवपंथीय तीन आखाड्यांचे प्रमुख महंत उपस्थित होते. तर ध्वजस्तंभालगतच्या दुसऱ्या बाजूला स्थानिक खासदार, आमदार आणि साधू-महंत आसनस्थ झाले होते.
रामकुंडाच्या पलीकडील तीरावर गौतमी झोन होता. या ठिकाणी विशेष व्यक्तींच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या व्यवस्थेलगतच्या भागात त्रिकाल भवन्ता यांना स्थान देण्यात आले. रामकुंडावर आल्यानंतर ही बाब लक्षात येताच भवन्ता यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, असे त्यांनी नमूद केले.
समान अधिकार का नाही ?
कुंभमेळ्यात महिला आखाड्यांना आणि महिलांना पुरुष आखाड्यांप्रमाणे समान अधिकार व मान-सन्मान मिळायला हवा. मागील दीड दशकांपासून ही मागणी केली जात आहे. देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण झाले. हा सन्मान सर्व महिला शक्ती आणि महिला संतांच्या सन्मानाशी जोडलेला आहे. त्यामुळे महिला आखाड्यांना प्रशासनाकडून प्रथम प्राधान्य मिळायला हवे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. महिला संतांना आणि पदाधिकाऱ्यांना ध्वजारोहणाचे उशिराने निमंत्रण देण्यात आले. आसन व्यवस्थाही योग्य नव्हती. महिला आखाड्यांच्या प्रमुखांना आणि महिला प्रतिनिधींना योग्य तो मान न दिल्याबद्दल त्रिकाल भवन्ता यांनी नाराजी व्यक्त केली.
प्रशासनावर टीका
महिला संतांमध्ये आचार्य, महामंडलेश्वर, साध्वी आणि महंत अशा पदांवर महिला पदाधिकारी असूनही त्यांना योग्य तो सन्मान दिला गेला नसल्याचा आरोप करत त्रिकाल भवन्ता यांनी प्रशासनावर टीका केली.
