नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांत अडथळे आणल्यावरून मध्यंतरी मनपा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने नगरसेवक आणि महिला नगरसेविकांच्या पतींच्या केलेल्या चौकशीचे संतप्त पडसाद महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.
प्रभागात पाणी पुरवठा होत नाही. याबद्दल चौकशी न करता प्रशासनाकडून नगरसेवकांची नावे पोलिसांना सांगितली जातात. पोलीस आमच्या नगरसेवकांना, पतीला उचलून नेतात, हा कोणता न्याय, असा प्रश्नही काही महिला नगरसेविकांनी उपस्थित केला. कथित ठेकेदार तुषार जगताप याने केलेल्या भ्रमणध्वनीची ध्वनिफित सभागृहात ऐकवत नगरसेवकांची बदनामी करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. पंचवटीतील रामकाल पथ तसेच आरटीओ कार्यालय-राज स्वीट चौक, रासबिहारी चौक -निलगिरी बाग दरम्यानच्या रस्त्याच्या कामात सत्ताधारी भाजप नगरसेवक व नगरसेविकेच्या पतींकडून अडथळे आणले गेल्याची चर्चा झाली होती.
टक्केवारीसाठी हे काम बंद पाडले गेल्याची तक्रार ठेकेदाराने केल्यानंतर मनपा प्रशासनाने ठेकेदाराला गुन्हे दाखल करण्याची सूचना देऊन पोलीस बंदोबस्त व पालिकेच्या सुरक्षारक्षकांच्या उपस्थितीत ही कामे सुरू करण्याचे ठरवले. पोलिसांनी संबंधित नगरसेवकांसह पाच जणांना बोलावून चांगलीच समज दिल्याचे सांगितले जाते. या घटनाक्रमाचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटले. पंचवटीतील नगरसेवकांनी एकत्र येत कथित ठेकेदार आणि महापालिका प्रशासनावर हल्लाबोल केला.
रस्त्याच्या कामात जलवाहिनी फुटल्याने पाणी पुरवठा झाला नसल्याची तक्रार केल्यानंतर तुषार जगताप नामक व्यक्तीकडून नगरसेवक हेमंत शेट्टी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्यात आला. या संदर्भातील ध्वनिफित सागर लामखेडे यांनी सभागृहात ऐकवत प्रभागातील समस्या मांडायच्या नाहीत का, असा प्रश्न केला. शेट्टी यांनी जगताप मनपाचा ठेकेदार आहे का, नगरसेवकांना दमदाटी करण्याचे कारण काय, असा प्रश्न केला. प्रियंका माने यांनी तर मनपा आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला.
दीड महिन्यांपासून प्रभागात पाणी पुरवठा होत नाही. त्याची दखल न घेता नगरसेवकांची नावे पोलिसांकडे सांगितली जातात. पोलीस आमचे नगरसेवक व पतींना उचलून नेतात. हा कोणता न्याय आहे, असा प्रश्न त्यांनी केला. शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी त्या रस्त्याचे काम शिवहरे कंस्ट्रक्शनला दिल्याचे सांगून जगताप कोण, हे माहिती नसल्याचे सांगितले.
महापौरांकडून प्रशासनाला इशारा
नगरसेवकांची नावे पोलिसांना कळवून त्यांची बदनामी करण्याचा प्रशासनाला कुठलाही अधिकार नसल्याचे महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी स्पष्ट केले. यापुढे प्रशासनाकडून असे प्रकार झाल्यास सभागृह प्रशासनाविरोधात भूमिका घेईल. अशा तक्रारी असतील तर नगरसेवकांना विश्वासात घेतले जावे. महापाैर म्हणून आपण या कृतीचा निषेध करीत असून, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी सिंहस्थ कामांविषयी दिलेल्या सुचनांचा प्रशासनाने गैरवापर अथवा वेगळा अर्थ काढू नये, अशी तंबी त्यांनी दिली.
