नाशिक – कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, कुंभनगरी नाशिकमध्ये उद्योग व्यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने तयारी केली आहे. त्या अंतर्गत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत कुंभ उद्योग संगम आणि जिल्हा गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उत्पादन, सेवासह अन्य क्षेत्राशी संबंधित तब्बल ११ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार होणार आहेत.

वाहन, इलेक्ट्रिक. वाइन निर्मिती, अन्न प्रक्रिया अशा अनेक क्षेत्रात नावारुपास आलेल्या नाशिकमध्ये इतरही क्षेत्रात विपूल संधी आहेत. मुंबईपासून समिपता, रेल्वे आणि हवाई सेवेने देशातील प्रमुख महानगरांशी संलग्नता यामुळे नाशिकच्या धार्मिक पर्यटनासह औद्योगिक क्षेत्राला गती देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, पायाभूत सुविधांचा विस्तार होत आहे. याचा लाभ सर्व क्षेत्रांना होणार आहे. उद्योग विभागाकडून राज्यात गुंतवणूक, उद्योग वाढीसाठी विविध प्रयत्न केले जात असून हा उपक्रम त्याचाच एक भाग आहे. कुंभमेळ्यात उद्योगांचे नेहमीच योगदान राहिले. आगामी कुंभमेळ्यात ही त्यांचे योगदान मिळेल, असा विश्वास उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी व्यक्त केला आहे.

नाशिकमध्ये उपलब्ध पायाभूत सोयी सुविधा, दळणवळणाची साधने, महामार्ग यामुळे गुंतवणूकदार या भागाकडे आकर्षित होत आहेत. आतापर्यंत झालेल्या सामंजस्य करारातून विविध उद्योग, व्यवसाय उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. गुंतवणूक परिषदेत दिवसभरात विविध विषयांवर चर्चा, परिसंवाद होणार आहे. या दिवशी साधारणत ३०० उद्योगांशी ११ हजार कोटींच्या गुंतवणुकीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणार असल्याचे उद्योग विकास आयुक्त कुशवाह यांनी सांगितले. यात उत्पादन, सेवा क्षेत्रातील उद्योगांसह अन्य क्षेत्रांचाही अंतर्भाव आहे. या शिवाय पर्यटन आणि अन्य विभागांना या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करण्यात आले असून या क्षेत्राशी संबंधित सामंजस्य करार होऊ शकतात.

मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकवर लक्ष…

या उपक्रमातून हजारो कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये होण्याचा मार्ग प्रशस्त झाला असून नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासाच्यादृष्टीने हे एक वरदान ठरणार आहे. नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन म्हणजेच निमाच्या सातत्याच्या पाठपुराव्याचे हे यश असल्याचे प्रतिपादन निमाचे अध्यक्ष आशिष नहार यांनी केले. पुणे आणि मुंबई येथे आता औद्योगिक विस्ताराची संधी नसल्याने औद्योगिक विकासाच्या नकाशावर नाशिकला ठळक प्राधान्य देण्याच्यादृष्टीने शासन स्तरावरून नियोजन सुरू असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.